वरणगाव, ता.भुसावळ – Bhusawal – Varangaon
गुजरात येथून नागपूरकडे तंबाखूजन्य पदार्थ चोरट्या मार्गाने घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वरणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी फुलगाव रेल्वे गेटजवळ ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला ट्रकमध्ये भांड्यांच्या खाली लपवलेली व राज्यातील प्रतिबंधीत असलेली सुमारे आठ लाखांची तंबाखू जप्त केली. दि.27 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान याबाबत दि. 6 रोजी अन्न व औषध प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोये व सहकार्यांनी फुलगाव रेल्वे गेटजवळ सापळा रचत ट्रक (क्र एमएच 42 बीजी 8266) थांबवून तिची तपासणी केली, असता भांड्याच्या खाली तंबाखू लपवली असल्याचे उघड झाले. दि. 6 रोजी अन्न-सुरक्षा विभागाचे के.आर.साळुंखे यांनी फिर्याद दिल्यावरून वरणगाव पोलिसात अन्न सुरक्षा व मानके 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आठ लाखांच्या तंबाखूसह सुमारे 20 लाखांचा ट्रक जप्त करण्यात आला. ट्रक चालक व क्लिनर यांना पोलिसांनी अटक केली आहे.