मुंबई | Mumbai
बॉलिवूडचे ‘ही मॅन’ आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल आज सोमवार, अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या धर्मेंद्रची प्रकृती आज सकाळी अचानक खालावली. मीडिया रिपोर्टनुसार आता त्यांची स्थिती गंभीर असल्याचे कळत आहे. धर्मेंद्र आयसीयूमध्ये असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकृती बिघडल्यानंतर तातडीने त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर हलवण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे व्हेंटिलेटरची मदत घेण्यात येत आहे. डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर चोवीस तास लक्ष ठेवून आहे. परंतु धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी किंवा रुग्णालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. याआधी ३ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या तब्येतीविषयी अपडेट दिली होती.
हेमा मालिनी यांना पापाराझींनी विचारले होते की, “सर्वकाही ठीक आहे का?” तेव्हा त्यांनी हाथ जोडून म्हटले होते की, “ठीक आहे.” याच वर्षी एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांच्या डोळ्यांची सर्जरी झाली होती. त्यांची दृष्टी कमी झाल्याने डोळ्यांच्या कॉर्निया ट्रान्सप्लांटची सर्जरी करण्यात आली होती. याशिवाय त्यांच्यावर मोतीबिंदूचीही शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा मुंबईतील रुग्णालयाबाहेर येताना त्यांचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. “माझ्यात खूप दम आहे. अजूनही मी ठीक आहे”, असे म्हणताना दिसले होते.
धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर झाल्याचे कळताच कुटुंबातील सदस्यांची रुग्णालयात धावपळ सुरू झाली आहे. सूत्रांनुसार, धर्मेंद्र यांचे पुत्र आणि अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासह कुटुंबातील सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत. प्रकृतीच्या गंभीरतेमुळे त्यांच्या मुलींनाही अमेरिकेतून तातडीने बोलावून घेण्यात आल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





