मुंबई | Mumbai
मराठी सह हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दया डोंगरे हे नाव घेतले की रुपेरी पडद्यावरची खाष्ट सासू डोळ्यासमोर उभी राहते. मराठी चित्रपटसृष्टीतला खलनायकी चेहरा म्हणून दया डोंगरे यांच्याकडे पाहिले जात असे. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते.
११ मार्च १९४० साली पुण्यात जन्मलेल्या दया डोंगरे यांना कलेचा वारसा मिळाला होता. त्यांच्या आई यमुनाबाई मोडक या प्रसिद्ध नाट्यअभिनेत्री होत्या, तर आत्या शांताबाई मोडक गायिका होत्या. तसेच त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते. शालेय काळापासूनच अभिनयाची आवड असलेल्या दया फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत असत. नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) नाट्यशिक्षण घेतले, जिथे त्यांना गायन आणि अभिनयासाठी शिष्यवृत्ती मिळाली.
दया डोंगरे यांनी वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणीच्या कर्नाटक धारवाड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगाच्या वेळी गाणे म्हटले होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दया डोंगरे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धा यामधून त्यांनी अभिनय केला. ज्यामुळे त्यांना अभिनयाची गोडी लागली. पुढे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचे उच्च शिक्षण घेतले. या दरम्यान त्यांचे लग्न शरद डोंगरे यांच्याशी झाले. शरद डोंगरे यांनीही त्यांची कलेची आवड जपली.
चित्रपट मालिकांमधून अजरामर भुमिका
दया डोंगरे यांनी विविध चित्रपट, नाटके आणि मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरील गजरा मालिकेतून दया डोंगरे लोकप्रिय झाल्या. त्यांनी ‘उंबरठा’ (१९८२) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून दया यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर, त्यांनी नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून, नकाब, लालची, चार दिवस सासूचे, कुलदीपक या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये खाष्ट सासूची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप पाडली. याशिवाय तुझी माझी जमली जोडी रे, नांदा सौख्य भरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी या मालिकांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठी सोबतच आश्रय, जुंबिश, नामचीन, दौलत कि जंग या हिंदी सिनेमांतही त्यांनी काम केले. १९९० नंतर त्यांनी अभिनय करणं थांबवलं. २०१९ मध्ये नाट्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन दया डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





