अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकर्यांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. खरीप पिकांच्या वाढीला पुरेसा पाऊस झाला असला तरी पुढील रब्बी हंगाम चांगला व्हावा, यासाठी सप्टेंबरअखेरीस व ऑक्टोबरच्या सुरूवातीस अपेक्षित असलेला परतीचा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या काही भागात सध्या काहीशी उघडीप जाणवत असली तरी हवामान विभागाच्या तज्ञाच्या अंदाजानुसार 13 ते 18 सप्टेंबरदरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह एकूण 25 जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
दुसरीकडे राज्याच्या काही भागात पावसाची उघडीप असली तरी विदर्भातील अकरा जिल्ह्यांत मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही टिकून राहणार आहे. मात्र या ठिकाणी मंगळवार, 16 सप्टेंबरनंतर तेथे पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीदरम्यानच्या चक्रीय वार्याच्या स्थितीमुळे आणि मान्सून आसाचा पश्चिम टोक दक्षिणेकडे सरकल्यामुळे महाराष्ट्रात नव्याने आर्द्रता खेचली जात आहे. त्यामुळे शनिवार (13 सप्टेंबर) पासून पावसाला पुन्हा प्रारंभ होईल, असा अंदाज आहे.
जिल्ह्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामातील पिकांच्या शेवटच्या टप्प्यातील कामकाजात गुंतलेले आहेत. मात्र, रब्बी हंगामासाठी आवश्यक आर्द्रता व मातीतील ओल राखण्यासाठी परतीच्या पावसावरच शेतकर्यांची मदार आहे. जर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला तर गहू, हरभरा, ज्वारीसारख्या पिकांची लागवड वेळेवर होईल आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट पाहत असून परतीच्या पावसावर संपूर्ण रब्बी हंगामाचे भविष्य अवलंबून राहणार आहे.




