Friday, September 4, 2026
HomeनगरAhilyanagar : सात महिन्यांत 32 कारवाया; 1.78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Ahilyanagar : सात महिन्यांत 32 कारवाया; 1.78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थांच्या साखळीच्या मुळापर्यंत पोहोचणार- एसपी सुदर्शन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

युवा पिढीचे संरक्षण आणि जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली असून, या गुन्हेगारी साखळीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या 32 कारवाया करण्यात आल्या असून 59 आरोपींकडून सुमारे 640 किलो अंमली पदार्थांसह 1 कोटी 78 लाख 57 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपस्थित होते. एसपी सुदर्शन म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि पुणे, नाशिक तसेच मुंबई या प्रमुख शहरांशी असलेली जवळीक लक्षात घेता एमडीसारख्या अंमली पदार्थांची गुप्त मार्गाने तस्करी व विक्री होत असल्याचे तपासातून समोर येत आहे. या रॅकेटच्या केवळ स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई करून न थांबता त्यामागील मुख्य पुरवठादार आणि संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी विशेष तपास पथके काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने आणि ड्रग्जमुक्त अहिल्यानगर या संकल्पनेतून येत्या गुरुवारी सकाळी 7.30 वाजता पोलीस मुख्यालयातून भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना आणि नागरिक सहभागी होणार असून सर्वांना नशामुक्तीची शपथही देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

दरम्यान अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील टपर्‍या व संशयित ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे पुन्हा विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार असल्याचे सुदर्शन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृतीबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात वाहतूक शिस्तीसाठी ट्रिपल सीट, विनानंबर प्लेट, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे आणि इतर नियमभंग करणार्‍या वाहनचालकांविरोधात सातत्याने कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध विशेष उपक्रम आणि गस्त वाढविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मटू प्लस टूफ या विशेष योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाणास्तरावर स्वतंत्र पथके स्थापन करून प्रतिबंधात्मक कारवाई, गुन्हेगारांवर लक्ष आणि गस्त वाढविण्यात येणार आहे. याशिवाय टाकळी ढोकेश्वर येथे नव्या पोलीस ठाण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर ते कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहितीही सुदर्शन यांनी दिली.

ताज्या बातम्या

दै.’देशदूत’चा आज ५७ वा वर्धापनदिन सोहळा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik जिल्ह्यातील जनसामान्यांच्या मनात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अढळ स्थान निर्माण करणार्‍या दैनिक ‘देशदूत’चा ५७ वा वर्धापन दिन आज शुक्रवारी (दि....