सोनई |वार्ताहर| Sonai
नाताळाच्या सलग सुट्ट्या असल्याने देशभरातून लाखो भाविक शनी दर्शनासाठी येत आहेत परंतु, एजंट, अवैध वाहतुकदार, हतगाड्यावाले तसेच वाहनतळ मालक यांच्याशी पोलिसांचे स्नेहाचे संबंध असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शनी भक्तांची सुरक्षा राम भरोसे असल्याचे बोलले जात आहे.
मागील आठवड्यापासून शनी दर्शनासाठी दररोज लाखोची गर्दी होत आहे. मुख्य रस्त्यांवर वाहने लावणे, भाविकांना पूजेची सक्ती करणे, खोट्या पावत्या दाखवून आपल्या दुकानात घेऊन जाणे, असे विविध प्रकार होत आहेत. परंतु पोलीस अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. पोलिसांच्या विरोधात परिसरात नाराजी व्यक्त केली जात आहे. यासाठी लवकरच परिसरातील एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन एक चांगल्या खमक्या अधिकार्याची नेमणूक करावी व शनी भक्तांची साडेसाती दूर करावी, अशी मागणी करणार आहे.
गर्दी वाढल्याने अनेकदा दर्शन रांग वाढत आहे. आरतीच्या वेळेस मंदिर परिसर भाविकांनी फुलून जातो. वाहतुकीची कोंडी अनेकदा पाहावयास मिळत आहे. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख काम करत असताना दिसले, तरीही भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थानने अधिक पाऊले उचलण्याची गरज आहे.
‘तो’ अनमोल पोलीस कर्मचारी
भक्तांनी पास काढले तरी चौथर्यावर जाऊन दर्शनासाठी तीन तास लागतात. परंतु पोलिसांची किंवा देवस्थानच्या कर्मचार्यांची ओळख असल्यास पास न काढताच झटपट दर्शन होतात. यामुळे मंदिरात नेमणूक असलेल्या एका पोलीस कर्मचार्याबाबत मोठी नाराजी पसरली आहे. वरिष्ठांचे नाव सांगून झटपट दर्शन करण्यासाठी त्याची लगबग चालू असते. त्या अनमोल कर्मचार्यावर कुणाची मेहरबानी आहे, याची मोठी चर्चा चालू आहे.
शिंगणापूर गावात शांतात बिघडली आहे. याला सर्वस्वी पोलीस जबाबदार असून आम्ही याबाबत ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. याचा पाठपुरावा करत आहे. परंतु मुद्दामहून पोलीस डोळेझाक करत आहे. कारण एजंटाकडून त्यांची ठेप ठेवली जाते. भविष्यात काही अघडीत घडले तर त्याची जबाबदारी शिंगणापूर पोलिसांची असेल, याबाबत लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या कारभाराची पुराव्यासह तक्रार करणार आहे. दर्शनाला येणार्या भाविकांना सुख शांती मिळावी यासाठी लढणार आहे.
– बाळासाहेब बानकर, माजी सरपंच शिंगणापूर