अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रसिध्द शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावे तयार करण्यात आलेल्या बनावट अॅप प्रकरणाचा येथील सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून गुगलकडे मागितलेली माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. पाच प्रकारचे बनावट अॅप तयार करून त्याव्दारे भाविकांकडून ऑनलाईन पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बनावट अॅप्स महाराष्ट्राबाहेरील परप्रांतीय व्यक्तींकडून तयार करण्यात आली असून, यासाठी परप्रांतीयांचे मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरले गेले आहेत, असा प्राथमिक अंदाज पोलीस तपासातून पुढे आला आहे.
बनावट अॅप तयार करून याव्दारे ऑनलाईन पूजा, तेल अर्पण, दर्शन बुकिंग यांसारख्या सुविधा असल्याचे भासवून भाविकांकडून दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम ऑनलाईन स्वीकारली जात होती. या प्रकरणी काँग्रेस, शनिसाई प्रतिष्ठाण व स्थानिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्याला तपासाचे आदेश दिले. त्यादृष्टीकोनातून पोलिसांचा तपास सुरू आहे. आता पोलीस तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
तपासाच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी संबंधित अॅप्सबाबत गुगलकडे माहिती मागवली होती. आता ती माहिती सायबर पोलिसांना प्राप्त झाली असून, त्यात धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. ही बनावट अॅप्स महाराष्ट्राबाहेरील परप्रांतीय व्यक्तींकडून तयार करण्यात आली असून, यासाठी परप्रांतीयांचे मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरले गेले आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर यातील अनेक धागेदोरे समोर येतील, असे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक व्यक्तींचा देखील सहभाग ?
या अॅपच्या माध्यमातून होत असलेली आर्थिक लूट ही एखाद्या संगठित साखळीच्या माध्यमातून चालवली जात असल्याचा संशय पोलिसांना असून, यामध्ये स्थानिकांचा देखील सहभाग असण्याची शक्यता तपासात पुढे आली आहे. त्यामुळे साखळीतील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कामाला लागले आहे.




