जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
विकास कमी करायला अक्कल लागते, पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. आ. रोहित पवार चांगले काम करत आहेत. त्यांना मदत करता आली नाही, तर त्याच्या कामात खोडा घालू नका, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे आ. राम शिंदे यांच्यावर टीका केली.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वंशज भूषणसिंहराजे होळकर, खा. निलेश लंके, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंखे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार राहुल मोटे आदी उपस्थित होते. खा. लंके म्हणाले, विरोधी पक्षाचे आमदार करोना काळात स्वतःच्या घरात राहून फक्त झाडांना पाणी देत होते. आ. रोहित पवार म्हणाले, खर्ड्याच्या पावन भूमीत शेवटची लढाई आपण जिंकला.
तसेच जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज याठिकाणी उभा केला. अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श घेऊन मी काम करीत आहे. महाराष्ट्रात पुढील काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून विरोधकांनी अडवलेली एमआयडीसी पुढील काळात लवकरच सुरू करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी केले. दत्ता वारे, भूषणसिंह होळकर यांचेही भाषण यावेळी झाले.