Friday, September 20, 2024
Homeनगरपवारांच्या आदेशामुळे नगर शहरात ‘सस्पेन्स’ वाढला

पवारांच्या आदेशामुळे नगर शहरात ‘सस्पेन्स’ वाढला

काँग्रेससह राष्ट्रवादीच्या पोटात गोळा || उबाठा गटाचा उत्साह वाढला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर शहर विधानसभा मतदारसंघात दिवंगत आ. अनिल राठोड यांनी भरीव काम केले आहे. त्यांच्या पुण्याईचा उपयोग आपल्याला आगामी निवडणुकीत निश्चितपणे होऊ शकतो. याबाबत शिवसेना (उबाठा) च्या विधानसभा जागे संदर्भात निर्णय घेण्यास सक्षम असलेल्या वरिष्ठांशी चर्चा झाली असल्याचे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पवार यांच्या वक्तव्यामुळे नगर शहर विधानसभेच्या जागेबाबत सस्पेन्स वाढला आहे. ही जागा कोण लढवणार याकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.

पुणे येथे मोदी बागेत नगर उबाठा शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शरद पवार यांच्याशी नुकतीच भेट झाली. त्यावेळी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसंदर्भात पवार यांनी शिवसैनिकांशी सखोल चर्चा केली. यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश कानडे, शिवसेना उबाठा गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यात युवा सेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड, गिरीश जाधव, मंदार मुळे यांची पवार यांच्या समवेत भेट झाली. कार्यक्रम संपल्यानंतर मोदी बागेत भेटा असे निर्देश पवार यांनी शिवसैनिकांना दिले. आ.रवींद्र धंगेकर यावेळी त्यांच्या समवेत होते. त्यानंतर पदाधिकार्‍यांनी तात्काळ मोदी बाग गाठले. पवार यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांशी सखोल चर्चा केली आणि शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल माहिती जाणून घेतली.

विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. आ. राठोड यांनी या मतदारसंघात भरीव असे कार्य केलेले आहे. त्यांच्या पश्चात विक्रम राठोड यांची या मतदारसंघावर पकड आहे. शिवसेना या भागात सक्षमपणे कार्यरत आहे. याविषयी समाधान व्यक्त केले. दिवंगत आ. राठोड यांच्या कार्यकर्तृत्चाचा आलेख मोठा असून त्यांचे विचार आणि वारसा पुढे नेणार्‍या उमेदवारालाच चांगली संधी आणि यश मिळेल यात शंका नाही. सेनेच्या वरिष्ठांशी याबाबत सखोल चर्चा केली आहे. अनिल भैय्यांच्या पुण्याईचा उपयोग सेनेने करून घ्यावा आणि ही जागा निश्चितपणे जिंकण्याची संधी सोडू नये, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी अनिल राठोड यांच्याशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा ठाम निर्धार सर्वांनी केला. दरम्यान, पवार यांनी स्पष्टपणे नगरच्या जागेबाबत सांगितलेले नाही. मात्र, पवार यांच्या भूमिकेमुळे गेल्या काही वर्षापासून नगर शहरात तयारी करणार्‍या काँग्रेस सोबत स्वत: पवार यांच्या राष्ट्रवादीची अडचण होण्याची शक्यता आहे.

नगर शहरात मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या बहुरंगी लढतीचा आ. संग्राम जगताप यांना फायदा झालेला आहे. यंदा देखील नगर शहरात एकास एक उमेदवारऐवजी बहुरंगी लढत झाल्यास त्याचा फटका त्यांना बसणार असून आ. जगताप यांचा मार्ग सुकर होणार आहे. निवडणुकीसाठी ‘तावात’ आलेल्या काँग्रेसचे काय होणार असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या