Friday, September 20, 2024
Homeक्राईमजादा परताव्याचे आमिष दाखवत दीड कोटींपेक्षा अधिकची फसवणूक

जादा परताव्याचे आमिष दाखवत दीड कोटींपेक्षा अधिकची फसवणूक

शेअर ट्रेडींगच्या नावाखाली फसविणार्‍याविरोधात गुन्हा दाखल || शेवगाव पोलिसांकडून तपास सुरू

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

- Advertisement -

तालूक्यातील लाडजळगाव येथील एका एजंटने शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामुळे संबंधित एजंट याच्या विरोधात दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण विक्रम बुधवंत (रा. शेवगाव) यांनी एजंट वैभव ज्ञानेश्वर कोकाटे याच्या विरोधात ही फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू झाला आहे.

बुधवंत यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले, कोकाटे याने व्ही. के. ट्रेडिंग सोल्युशन नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग व्यवसाय सुरू केला होता. तसेच एक लाख दिले तर प्रती महिना 10 टक्केप्रमाणे परतावा देणार असल्याचे आश्वासन बुधवंत यांना दिले. कोकाटे याच्या आमिषाला बळी पडून बुधवंत व त्यांच्या ओळखीच्या लोकांनी वेळोवेळी आरटीजीएस व रोख स्वरुपात पैसे कोकाटे याला ट्रान्सफर केले. दरम्यान शेअरमध्ये गुंतवणूक केलेली मूळ रक्कम आणि परतावा देण्यास टाळाटाळ करून कोकाटे पळून गेला.

याप्रकरणात बुधवंत यांची 95 लाख 56 हजार, तर प्रभाकर पंडित खेडकर (रा. राणेगाव) 2 लाख, पंडित गेनू खेडकर (रा. राणेगाव) 1 लाख, राजेंद्र अंबादास पालवे (रा. राणेगाव) 4 लाख, एकनाथ आसाराम भुसारे (रा. बोधेगाव 9 लाख 5 हजार), दिलीप अंबादास गायकवाड (रा. बोधेगाव) 18 लाख, अशोक भाऊसाहेब तहकिक (रा. लाडजळगाव 10 लाख), नवनाथ धर्मराज चेमटे (रा. शिंगोरी) 1 लाख, मनोहर आबासाहेब घोरपडे (रा. बोधेगाव) 1 लाख, किरण देविदास तहाकिक (रा. लाडजळगाव) 6 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झालेली आहे.

तसेच 16 जुलै रोजी तेजस काकासाहेब तानवडे, रा. पिंगेवडी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून कानिफनाथ अशोक काजळे, रा.सोनविहीर, याचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काजळे याने मोहटादेवी ट्रेडिंग कंपनी या नावाने कार्यालय सुरू करून परिसरातील नागरिकांनी 16 टक्के प्रती महिना परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काजळे याच्यावर विश्वास ठेऊन रानडे यांनी 11 लाख रुपये रोख दिले होते. दीड महिन्यांत परतावा म्हणून 2 लाख रुपये तानवडे यांना परत दिले. त्यानंतर त्याने परतावा व मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ केली.

गावातील किरण बबन वाघ 10 लाख, तेजस काकासाहेब तानवडे 11 लाख, उद्धव शहादेव वाघ 3 लाख, तुकाराम भाऊसाहेब तानवडे 13 लाख, ज्ञानेश्वर सुभाष मुंढे 8 लाख, कैलास गोरक्ष घुले 3 लाख, नंदु साहेबराव अकोलकर 50 हजार, आप्पासाहेब रामभाऊ अकोलकर 75 हजार रुपये अशी एकूण 49 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. दरम्यान शेवगाव पोलिसांकडून फसवणूक झालेल्या लोकांच्या अर्जावर पडताळणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल होत आहेत. तथापि पळून गेलेले शेअर मार्केट एजंटांचा ठावठिकाणा नसल्याने आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या