अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील एका शिक्षकाची ऑनलाईन ‘शेअर ट्रेडिंग’च्या आमिषाला बळी पडून तब्बल 1 कोटी 31 लाख 65 हजार रूपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महिलेविरूध्द शनिवारी (21 मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूकृपा हौसिंग सोसायटी, साताळकर हॉस्पिटलजवळ, अहिल्यानगर येथे राहणार्या 56 वर्षीय शिक्षकाने फिर्याद दिली आहे. ते मार्कंडेय विद्यालयात उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांना व्हॉट्सअॅपवर शेअर ट्रेडिंगबाबत जाहिरात प्राप्त झाली. अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधितांनी त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपमधील अॅडमिन दीपा रसीमाने हिने गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. तिच्या सांगण्यावरून फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी तसेच बहिणीच्या बँक खात्यांतून विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी मोठ्या रकमा ट्रान्सफर करण्यात आल्या.
27 नोव्हेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत फिर्यादी यांनी स्वतःच्या खात्यातून सुमारे 77 लाख 45 हजार रूपये, मुलाच्या खात्यातून 8 लाख 90 हजार रूपये, मुलीच्या खात्यातून 1 लाख 30 हजार रूपये, पत्नीच्या खात्यातून 30 लाख रूपये तसेच बहिणीच्या खात्यातून 14 लाख रूपये अशी एकूण 1 कोटी 31 लाख 65 हजार रूपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये जमा केली.
दरम्यान, गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची वेळ आल्यानंतर आरोपी महिलेने आणखी पैसे भरण्याची मागणी केली. यानंतर संशय आल्याने फिर्यादीने संबंधिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क तुटला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर (हेल्पलाईन 1930) तक्रार नोंदवली तसेच येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विविध बँक खात्यांचा वापर करून रक्कम वळवली असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरूआहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले अधिक तपास करीत आहेत.
अशा फसवणुकींपासून कसे वाचाल ?
अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणुकीच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका, अधिक नफ्याचे आमिष दाखवणार्या जाहिरातींपासून सावध राहा, कोणतीही रक्कम ट्रान्सफर करण्यापूर्वी खात्री करा, संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.




