नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपद हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे गेले. अशातच अलीकडे झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्यात आले. त्यांनी गुरुवारी (९ एप्रिल) राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांना उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी पार्थ पवार यांना खासदारकीची शपथ दिली.
पार्थ पवार यांच्या खासदारकीच्या शपथविधी वेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी पार्थ पवार यांच्या पेहरावने आणि शपथ घेण्याच्या शैलीने सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी त्यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली.
पार्थ पवारांच्या लुकची चर्चा
राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेताना पार्थ पवार यांनी अजितदादा परिधान करायचे तसेच गुलाबी जॅकेट परिधान केल्याचे पाहायला मिळाले. पार्थ पवारांच्या एकंदरीत लूकमुळे अजित पवारांचीच आठवण झाल्याचे म्हटले जात आहे. पार्थ पवारांच्या या लूकची सध्या राज्यभर चर्चा रंगली आहे. तसेच, त्यांनी अजितदादांचा चष्मादेखील घातला होता. यावेळी, त्यांच्या शैलीने सर्वांनाच अजित पवार यांची आठवण झाली. पार्थ पवार यांच्या या पहिल्याच संसदेतील प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिनिधित्व देश पातळीवर प्रबळ होणार आहे. पार्थ पवार प्रथमच खासदार म्हणून संसदेत प्रवेश करत आहेत.
दरम्यान, सुनेत्रा अजित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत पार्थ पवार यांना मायेचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. पार्थ अजित पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. देशाचे उपराष्ट्रपती सीपी. राधाकृष्णन जी यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली. जनतेच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या माध्यमातून तरुण नेतृत्वाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करते. लोकहित, विकास आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून ते संसदेत प्रभावीपणे कार्य करतील, अशी खात्री आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!




