Monday, July 20, 2026
Homeक्राईमCrime News : गुंतवणूकदारांना आरोपी करण्याची धमकी देत लाखो उकळले

Crime News : गुंतवणूकदारांना आरोपी करण्याची धमकी देत लाखो उकळले

शेवगाव शेअर मार्केट घोटाळा || अंमलदाराच्या व्हायरल व्हिडिओंनी खळबळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शेवगाव येथील बहुचर्चित शेअर मार्केट घोटाळ्याच्या तपासावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आर्थिक गुन्हे शाखेतील एका पोलीस अंमलदारावर गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपी करण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करण्यात आल्याचा दावा संबंधित गुंतवणूकदारांनी केला असून, या प्रकरणातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शेवगाव येथील कोट्यवधी रुपयांच्या शेअर मार्केट घोटाळ्यामुळे राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. जादा परताव्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून, काही संशयितांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. तर काही गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, तपास सुरू असतानाच गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांच्याच विरोधात कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणातील गुंतवणूकदार यशवंत पाटेकर, हर्षल दौंड आणि उमाकांत ढगे यांनी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, राठोड याने वारंवार व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून संपर्क साधला. चौकशीच्या नावाखाली नोटिसा बजावून त्यांना भेटण्यासाठी बोलावले गेले. त्यानंतर तुम्हालाही आरोपी केले जाईल अशी भीती दाखवत स्वतःसह वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात संबंधित गुंतवणूकदारांनी यापूर्वीच पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे सोपविण्यात आली होती. मात्र चौकशीनंतर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. तसेच आपल्या तक्रार अर्जावर नेमकी कोणती कारवाई झाली, याची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविण्यात आली असून, पोलीस अधीक्षक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये एका चारचाकी वाहनात बसून पोलीस अंमलदाराने दोन लाख रुपये स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओची सत्यता अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नसली तरी तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुंतवणूकदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीत संबंधित पोलीस कर्मचार्‍यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याबरोबरच फसवणुकीचाही गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणातील सर्व पुरावे संबंधित यंत्रणांकडे सादर करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. शेवगाव शेअर मार्केट घोटाळ्यामुळे आधीच हजारो गुंतवणूकदार आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत तपास यंत्रणेवरच लाचखोरीचे आरोप झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणार का, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा होरपळून...

0
वर्धा । Wardha 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. वर्धा जिल्हा हद्दीत उभ्या असलेल्या एका इथेनॉलच्या ट्रकला पुण्याकडून येणाऱ्या कारने...