अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेवगाव येथील प्रेमसंबंधातून झालेल्या खुन प्रकरणातील फरार आरोपी अफरोज सुलतान खान (वय 45 वर्षे, रा. कटकटगेट, ता. जि. छ. संभाजीनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेने प्रवरासंगम (ता. नेवासा) येथून शनिवारी (दि.23) जेरबंद केले. 12 ऑगस्ट 2025 रोजी मुंगी शिवारात शेताच्या कडेला एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत सचिन पुंडलिक औताडे (वय 32, रा. शिवनेरी कॉलनी, हार्सुल, छत्रपती संभाजीनगर) याचा प्रेमसंबंधातील वादातून खुन करून प्रेताची विल्हेवाट लावणार्या दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद, ता. खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर) व भारती रवींद्र दुबे (रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना जेरबंद केले होते. त्यांना मदत करणारा साथीदार अफरोज खान पसार झाला होता.
त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. पथकाला गुप्त बातमीदारामार्फत अफरोज खान प्रवरासंगम येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार सापळा रचत पथकाने अफरोज खानला जेरबंद केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह अंमलदार अंमलदार सुरेश माळी, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, सारिका दरेकर, भगवान धुळे यांच्या पथकाने केली.





