Monday, October 14, 2024
Homeनगरनिरिक्षकांसमोरच शेवगाव-पाथर्डीतील भाजपमधील दोन गट आमने-सामने

निरिक्षकांसमोरच शेवगाव-पाथर्डीतील भाजपमधील दोन गट आमने-सामने

विधानसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी नगरमध्ये बोलावले होते पदाधिकारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पक्ष संघटनेसह अन्य पदाधिकार्‍यांकडून संभाव्य उमेदवारांची नावे जाणून घेण्यासाठी खास निरीक्षक पाठवून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानूसार शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाची मंगळवारी नगरला बैठक बोलावली होती. मात्र, या ठिकाणी भाजपमधील आ. मोनिका राजळे आणि शेवगावचे अरुण मुंडे गट आमने-सामने आले. यावेळी पक्षाशी संबंधित नसणार्‍या कार्यकर्त्यांना बोलवण्यात आले असून त्यांच्याकडून उमेदवारीसाठी नावे घेण्यात येत असल्याचा जोरदार आक्षेप शेवगावमधील भाजप पदाधिकार्‍यांनी घेतला. यावरून पक्ष निरिक्षकांसमोरच दोन ते तीन वेळा चांगला गोंधळ झाला.

- Advertisement -

नगरच्या शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी दुपारी शेवगाव-पाथर्डीतील भाजप पक्ष संघटनेतील पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य यासह अन्य संस्थांच्या निवडक पदाधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. याठिकाणी आलेल्या पदाधिकार्‍यांकडून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण असावा, यासाठी पसंतीक्रमाने तीन नावे लिहून ती लिफाफ्यात बंद करून पक्ष निरिक्षक यांच्याकडे सुर्पूद करावयाची होती. या प्रक्रियेसाठी पक्षाकडून अरूण साने हे निरिक्षक पाठवण्यात आले होते. पक्षाच्या नियोजनानूसार नगरच्या विश्रामगृहावर ही प्रक्रिया सुरू असतांना शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात पदाधिकारी नसणारे व्यक्ती हे विधानसभेसाठी इच्छुकांची नावे लिहून देत असल्याचा आक्षेप शेवगावचे भाजपचे तुषार वैद्य, अरूण मुंडे आणि पाथर्डीचे गोकुळ दौंड यांनी आमदार राजळे यांच्या गटावर घेतला. आ. राजळे गट पक्षपाती करत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. तर आ. राजळे गटाकडून त्याचे जोरदार खंडन करण्यात आले.

यावरून भाजपमधील दोन गटात चांगलाच वादाचे खटके उडाल्याचे दिसून आले. तर काही पदाधिकार्‍यांना जाणीवपूर्वक मुलाखतीबाबत कळवण्यातच आले नसल्याचे काही पदाधिकार्‍यांचे म्हणणे यावेळी होते. मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याने काही काळ निरिक्षक साने यांनी कामकाज थांबवले होते. या गोंधळामुळे शेवगाव-पाथर्डीतील भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला.

दरम्यान, शेवगाव-पाथर्डीच्या बैठकीत कोणताही गोंधळ झाला नाही. पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांना त्यांची नावे देता आली नाही. वेळेअभावी हे घडले. त्यामुळे त्यांनी निरिक्षकांकडे मागणी करत पुन्हा प्रक्रिया राबवण्याची मागणी केली. यापेक्षा वेगळे काही झाले नाही, बैठक शांततेत झाली असे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने दिलेला कार्यक्रम नि:पक्षपातीपणे राबवणे आवश्यक होते. मात्र, लोकप्रतिनिधींनी त्यांचे समर्थक बैठकीत बोलावून पक्षाच्या नियमीत पदाधिकार्‍यांऐवजी समर्थकांकडून उमेदवारीसाठी स्वत:च्या नावाची यादी सादर केली. आलेेल्या निरीक्षकांना शेवगाव-पाथर्डीतील नावे असणारा कार्यकर्ता हाच आहे का ? हे प्रत्यक्षात माहीत नव्हते. पाहुण्यांच्या अज्ञानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काहींनी केला. ही बाब शेवगाव-पाथर्डीतील पदाधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. यातून गोंधळ झाल्याचे काही भाजपच्या पदाधिकार्‍यांनी खासगीत सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या