शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
दिल्ली येथे गुरुवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिल्याबद्दल गृहमंत्र्याचे आभार मानत शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात चर्चा केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. महायुतीच्या सरकारमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे सातव्यांदा निवडणुकीत विजय संपादन करणारे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपने दुसर्या क्रमांकावर कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्याचा मान मिळून देत जलसंपदामंत्री या खात्याची जबाबदारी दिली त्याबद्दल गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे जाऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
या भेटी दरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात चर्चा करताना रात्रीच्या वेळी सुरक्षा दलाच्या कमतरतेमुळे विमानांना नाईट लँडिंगमध्ये अडचणी येतात. त्यामुळे रात्रीच्या लँडिंगला परवानगी मिळत नाही ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ सीआयएसएफचे अतिरिक्त सुरक्षा दल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता लवकरच शिर्डी विमानतळ येथे विमानांची नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय विखे पाटील यांनी अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
शिर्डी येथे विमानांची नाईट लाइनिंग सुविधा नसल्यामुळे भाविकांना तसेच विमान प्रवास करणार्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. परंतु जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा करून नाईट लँडिंगचा प्रश्न सोडविला त्यामुळे साई भक्त तसेच नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
– कैलासबापू कोते, शिर्डी माजी नगराध्यक्ष