रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
साईभक्तांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाची संरक्षक भिंत काकडी-संगमनेरकडे जाणार्या रस्त्याच्या बाजुने सोमवारी दुपारी पावसामुळे कोसळली आहे. विमानतळाची संरक्षक भिंत कोसळण्याची ही चौथी वेळ आहे. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुर्वीही तीनदा विमानतळाची संरक्षक भिंत कोसळली होती. तिसर्यांदा तर चार ठिकाणी भिंत कोसळली होती. सोमवारी दुपारच्या दरम्यान झालेल्या किरकोळ पावसामुळे विमानतळाची भिंत चौथ्यांदा कोसळली.
फायर स्टेशच्या थोडे पुढे ही भिंत कोसळली आहे. तिसर्यांदा भिंत कोसळली त्या वेळेस शेजारील शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसून नुकसान झाले होते. संरक्षक भिंतींचे काम चालु असताना स्थानिकांनी हे काम निकृष्ठ होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र तेव्हाच्या आधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. संरक्षक भिंत पडल्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सातत्याने संरक्षक भिंत कोसळत असताना विमानतळ विकास प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अगदी निकृष्ठ पध्दतीने या संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर सर्वाधिक पसंती या विमानतळास मिळाली मात्र प्रवाशांच्या सुमार दर्जाच्या सोयीच्या बाबतीत नेहमीच हे विमानतळ चर्चेत असते.