शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डी शहरात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या ठिकाणी गुन्हेगारी व दादागिरी करणार्यांचा थेट एन्काऊंटर करा व शिर्डी देवस्थानाच्या ठिकाणची दादागिरी, गुन्हेगारी कायमस्वरूपी मोडीत काढून दहशतमुक्त शिर्डी शहर निर्माण करा, अशी मागणी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली. शिर्डी शहरातील दारू धंद्यासह सर्व अवैध धंदे तसेच दादागिरी व गुन्हेगारीचा बिमोड केला पाहिजे. ब्राऊन शुगर, व्हाईट शुगर, दारू यासह सर्वच दोन नंबर अर्थात अवैध धंद्यांचा तातडीने कायमचा बंदोबस्त करून दहशतमुक्त शिर्डी निर्माण झाली पाहिजे.
शिर्डी शहरातील अवैध धंदे व दादागिरी कायमची मोडीत काढून दहशत मुक्त शिर्डी शहर निर्माण करण्याकरिता शासनाने गुन्हेगार, गुंड प्रवृत्तीचे दादागिरी करणारे व अवैध धंद्याविरोधात कठोरात कठोर कारवाई करुन शिर्डी शहर दहशतमुक्त करावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो त्याचेवर कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे. दोष नसताना दोन संस्थान कर्मचार्यांची हत्या झाली आहे. दुहेरी हत्याकांडातील मयत दोन्ही संस्थान कर्मचार्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. या दुहेरी हत्याकांडात मृत पावलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांचे कुटुंबातील एका व्यक्तीस साईबाबा संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी सामावून घ्यावे, तसे आदेश शासनाने देवस्थानला करावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेनेचे अहिल्यानगर उत्तरजिल्हा प्रमुख कमलाकर कोते, डॉ. चेतन लोखंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.