Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमशिर्डीचा कुख्यात गुंड पाप्या शेखने केली कारागृहात कर्मचार्‍यांना मारहाण

शिर्डीचा कुख्यात गुंड पाप्या शेखने केली कारागृहात कर्मचार्‍यांना मारहाण

नाशिक | Nashik

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी व कुख्यात गुंड सलीम ऊर्फ पाप्या शेख याने नाशिकरोड कारागृहातील तुरुंग अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी कैद्यांची अंगझडती घेताना घडली. त्याचवेळी दुसर्‍या कैद्याने स्वत:च्या मानेवर कटरने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कारागृहातच घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून, जखमी कैद्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, कुख्यात गुंड पाप्या शेख (रा. कालिका नगर, शिर्डी, राहाता, जि. अहिल्यानगर) व त्याच्या साथीदारांनी जून 2011 रोजी शिर्डीतील प्रवीण गोंदकर व रचित पाटणी याचे एक लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून एकमेकांना अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडत त्यांचा निर्घृण खून केला. याप्रकरणी कुख्यात गुंड पाप्या शेख यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्यासह बारा जणांवर मोक्कासह अवैधरित्या शस्त्रास्त्रे तस्करी केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कुख्यात गुंड पाप्या शेख याची काही महिन्यांपूर्वीच रवानगी पुणे कारागृहातून नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. शनिवारी (दि.9) सकाळी साडेनऊ वाजता नियमानुसार कारागृह अधिकारी व अंमलदार हे बॅरेकजवळ कैद्यांची अंगझडती घेत होते. त्यावेळी पाप्या शेख याने काहीतरी कारणातून तुरुंग अधिक्षक (वर्ग 1) जगदीश ढुमणेंसह अन्य तुरुंग अधिकार्‍यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावेळी दुसरा शिक्षा बंदी तबरेज ऊर्फ तब्बू दरवेश खान याने स्वत:कडे लपविलेले धारदार कटर काढून स्वत:च्याच मानेवर वार करुन घेतले. याप्रकरणी दोघांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात बीएनएस कलमान्वये सरकारी कामात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा करण्यात आला आहे. याप्रकरणी जगदीश ढुमणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास हवालदार नंदू भोळे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या