अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिर्डी येथे डिफेन्स प्रोजेक्ट निर्मितीचे काम सुरू झाले असून एक वर्षात हा प्रकल्प सुरू होईल व तेथे दोन हजार जणांना रोजगार मिळेल, असे स्पष्ट करून उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, येत्या पंधरा दिवसांत नगरला स्वतंत्र बैठक घेऊन जिल्ह्यातील औद्योगिक अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू ,अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांनी महाराष्ट्र व देश घडवला आहे. त्यामुळे छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहणार्यांना महाराजांचा वारसा समजलेला नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही व त्यांनी राजकारण सोडले पाहिजे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी येथे व्यक्त केली.
संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यावर महायुतीकडून त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनीही मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज व सर्व संत परंपरेवर जो कोणी वादग्रस्त भाष्य करेल, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना आपण दिल्याच्या सांगून असे वादग्रस्त भाष्य करणार्यांची प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे, असे मतही सामंत यांनी व्यक्त केले तसेच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा सज्जड दमही असे वादग्रस्त वक्तव्य करणार्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावेडीतील भिस्तबाग चौकात शिवप्रहार संघटनेने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाविकास आघाडी सरकार येत असताना दोन्ही पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध केल्याचे भाष्य ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच दिल्लीत शरद पवार यांनी केलेला सत्कार काहींच्या वर्मी लागला आहे व त्यातून असे भाष्य होते. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेब कधीही दुसर्या पक्षात असा हस्तक्षेप करीत नाहीत. मात्र, अशा वक्तव्यातून एकनाथ शिंदेंवर टीका केली जात असली तरी ती आम्ही मनावर घेत नाही व जनतेनेही घेऊ नये. कारण त्यांनी 97 जागा लढवल्या व त्यांच्या फक्त 20 आल्या, आम्ही 80 लढवल्या व आमचे 60 जण निवडून आले. त्यामुळे त्यांनी बोलत रहावे त्यांना शिंदेंच्या बदनामीचा पोटशूळ उठला आहे अशी टीका सामंत यांनी राऊत यांचे नाव न घेता केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वार असल्याच्या चर्चा निराधार आहेत. शिवजयंतीच्या कार्यक्रमात तिघेही एकत्रच होते, सारे काही ठंडा ठंडा कुलकुल आहे असे तिघांनी स्पष्ट केले आहे. मात्र ज्यांना पुरशुळ आहे असे त्यांच्यात वाद असल्याची चर्चा घडवण्याचा प्रयत्न करतात, असा दावाही कोणाचाही नाव न घेता सामंत यांनी केला.