शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर (Shirdi Double Murder) पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी (Police) मोठी कारवाई सुरू करत गुरुवारी 100 पेक्षा जास्त व्यक्तींची धरपकड करून त्यांची चौकशी करण्याचे काम सुरू केले होते. पोलिसांनी 23 कमिशन एजंटला कोर्टात पाठवले. ज्यांच्यावर उद्या दंडात्मक कारवाई होणार आहे. याशिवाय दारूच्या 6 ठिकाणी छापे टाकून दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले आणि मालकांवर गुन्हे दाखल केले. दोन मटका केंद्रांवरही पोलिसांनी धाड टाकली. 34 रिक्षा जप्त (Riksha Seized) करून पोलीस स्टेशनला जमा केल्या आहेत. अवैध व्यवसायासाठी भाड्याने जागा देणार्या व्यक्तीवरही कारवाई झाल्यास अवैध व्यवसायांना चाप बसेल.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola), अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या. यात शहर पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देशमुख, परिवहन विभागाचे निरीक्षक जोशी तसेच पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव, विक्रांत कचरे, विजयसिंह ठाकुर, धाकराव आदि अधिकार्यांनी आपआपल्या टीमसह सहभाग घेतला. या कारवाईत एकूण जवळपास शंभर कर्मचार्यांनी सहभाग घेतला. 11 गुन्हेगारांना (Criminal) शिर्डीतून तडीपार करण्यात आले आहे आणि त्यांची तपासणी सुरू आहे. विनानंबर वाहनावरही कारवाया करण्यात येणार आहे. दोन पोलीस जीप व अनेक मोटर सायकल पेट्रोलिंग करत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कारवाया नियमित सुरू राहतील, असे नव्यानेच दाखल झालेले पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी सांगितले.
शिर्डीत येणार्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी, शहरातील हॉटेल आणि लॉज मालकांनी विविध सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निरीक्षक गलांडे यांनी आहे. ग्राहकांचे आधारकार्ड, ओळखपत्र घेऊन त्याची प्रत ठेवा, ग्राहकांचे नाव, फोन नंबर आणि नातेवाईकांचा नंबर रजिस्टरमध्ये नोंदवा, हॉटेल/लॉजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चालू ठेवा, परदेशी नागरिकांची माहिती पोलिसांना द्या आणि सी फॉर्म जमा करा. काही संशयास्पद दिसल्यास पोलिसांना कळवा, ग्राहकांच्या येण्याची-जाण्याची वेळ आणि त्यांच्या वाहनांचा नंबर नोंदवा, 18 वर्षांखालील मुलांना पालकांशिवाय रूम देऊ नका, हॉटेल/लॉजचा वापर अनैतिक कामांसाठी करू नका या सूचनांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक गलांडे यांनी दिला आहे.