Wednesday, September 9, 2026
HomeनगरShirdi News : शिर्डीत साई महापरिक्रमा उत्सवाला लाखो भाविकांची उपस्थिती; जगभरातून भाविक...

Shirdi News : शिर्डीत साई महापरिक्रमा उत्सवाला लाखो भाविकांची उपस्थिती; जगभरातून भाविक साईच्या दरबारी

शिर्डी (प्रतिनिधी)

साईनामाचा जयघोष, पारंपारिक वाद्यांचा गजर, विविध शाळांचे आकर्षक चित्ररथ आणि लाखो भाविकांची अलोट गर्दी अशा अत्यंत भक्तीमय वातावरणात शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी ‘शिर्डी महापरिक्रमा’ सोहळ्याची सांगता झाली. या परिक्रमेसाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातील १५ देशांतून भाविक शिर्डीत दाखल झाले होते. सुमारे अडीच लाख साईभक्तांनी या १४ किलोमीटरच्या परिक्रमेत सहभागी होऊन साईभक्तीचा अनोखा आनंद लुटला.

- Advertisement -

शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता शिर्डीतील ऐतिहासिक खंडोबा मंदिरासमोर रथातील साईबाबांच्या प्रतिमेची भावपूर्ण महाआरती करण्यात आली. यावेळी महंत रामगिरी महाराज, काशीकानंद महाराज, देऊडकर महाराज, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते रथ ओढून परिक्रमेचा शुभारंभ झाला. पहाटे पावणेसहा वाजता सुरू झालेली ही परिक्रमा शिर्डी परिसरातील मार्गक्रमण करत दुपारी एक वाजता पुन्हा खंडोबा मंदिर येथे विसावली.

साईबाबांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या महोत्सवाचे नियोजन ‘ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशन’तर्फे करण्यात आले होते. या सोहळ्याला श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी नगरपरिषद, शिर्डी पोलीस आणि समस्त ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिर्डी शहर आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची लेझीम पथके, पावली, संबळ पथक आणि भजनी मंडळींनी संपूर्ण मार्गावर भक्तीचा रंग भरला. ठिकठिकाणी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, फुलांचा वर्षाव आणि स्वागत कमानींमुळे शिर्डी नगरी उजळून निघाली होती.

योगायोगाने महापरिक्रमेचा हा दिवस एकादशीचा असल्याने दानशूर भाविक आणि सामाजिक संस्थांकडून फराळाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. परिक्रमा मार्गावर १०० हून अधिक ठिकाणी साबुदाणा खिचडी, फळे, चहा-नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. शिर्डीकर ग्रामस्थ स्वतः रस्त्यावर उतरून भाविकांचे स्वागत करत होते, तर शेकडो स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी तत्पर होते.

गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनासोबत ५०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून ठिकठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात आले होते आणि ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण सोहळ्यावर आकाशातून नजर ठेवली जात होती. भाविकांच्या सोयीसाठी फिरते शौचालय, प्रथमोपचार केंद्रे आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. परिक्रमा पूर्ण झाल्यावर साईबाबा संस्थानतर्फे भाविकांना उदी आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, महंत रामगिरीजी महाराज आणि काशीकानंदजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा भव्य सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला, अशी भावना संयोजकांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक होणार

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai वीज निर्मिती क्षेत्रातील टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या दोन कंपन्या राज्यात अणुवीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही...