Tuesday, October 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : सायबर गुन्ह्यातील रक्कम पेट्रोलपंपाच्या खात्यात; जिल्ह्यात ​क्यूआर कोडद्वारे...

Nashik Crime News : सायबर गुन्ह्यातील रक्कम पेट्रोलपंपाच्या खात्यात; जिल्ह्यात ​क्यूआर कोडद्वारे पैसे घेणारे आंतरराज्यीय रॅकेट

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वैद्यकीय आणि कौटुंबिक आणीबाणीचे भावनिक कारण सांगून पेट्रोल पंपांवरून रोख रक्कम (कॅश) उकळायची, त्याबदल्यात क्यूआर कोडद्वारे (QR Code) पंपाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आणि काही दिवसांनंतर पेट्रोल पंप चालकांची बँक खातीच होल्डवर (फ्रिज्ड) टाकायची, असा धक्कादायक व नियोजनबद्ध आंतरराज्यीय सायबर घोटाळा जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

- Advertisement -

​कळवण, देवळा, सटाणा आणि दिंडोरी या ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांना या सायबर रॅकेटचा मोठा फटका बसला असून, केरळ, उत्तर प्रदेश व जम्मू-काश्मीरमधील सायबर तक्रारींमुळे डीलर्सची चालू खाती गोठवण्यात आली आहेत. खाती सील झाल्यामुळे कोट्यवधींचे दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून पेट्रोल पंप संकटात सापडले आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांना पत्र देऊन सखोल तपासाची मागणी केली आहे. निवेदनावर असोसिएशनचे माजी अध्यक्ष भूषण भोसले, राजेश पाटील, प्रसाद सावकार, रोहित ब्राह्मणकर, आशिष सावंत, प्रशांत देवरे, नयन नेरकर, कुणाल जाधव, रितेश धात्रक आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

​डिजिटल अरेस्ट अन् ब्लॅकमेलिंगचा संशय?

​या घोटाळ्यातील तक्रारी थेट केरळ, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर अशा दूरच्या राज्यांतील सायबर सेलकडे दाखल झाल्याचे समोर आले आहे. बँक खाते लॉक झाल्यानंतर काही ठिकाणी तक्रारदारास पैसे रिफंड करा, मगच एनओसी देऊ व अकाउंट सुरू होईल, असे संशयास्पद फोन आणि ई-मेल्स येत असल्याने हे संघटित सायबर रॅकेट किंवा डिजिटल अरेस्टसारखा प्रकार असावा, असा संशय पेट्रोल डीलर्सनी व्यक्त केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार कारवाई करावी

​सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत असोसिएशनने संपूर्ण बँक खाते गोठवण्याऐवजी केवळ वादग्रस्त रकमेपुरताच होल्ड ठेवून उर्वरित बँक खाते व व्यवहार तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश बँकांना दिले जावेत. पंपांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि यूपीआय ट्रान्सझॅक्शन डिटेल्सच्या आधारे मुख्य संशयित आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अशी आहे मोडस

​गेल्या ५ ते ७ दिवसांत नाशिकच्या ग्रामीण भागात हे प्रकार वेगाने घडले आहेत.
संशयित पेट्रोल पंपावर येऊन कौटुंबिक, वैद्यकीय अडचण किंवा प्रवासादरम्यान पैसे संपल्याचे कारण सांगून रोख पैशांची अत्यंत घाईत मागणी करतात.
रोख रकमेच्या बदल्यात ते पंपाच्या अधिकृत क्यूआर कोडवर ऑनलाईन रक्कम वर्ग करतात आणि कर्मचाऱ्यांकडून तेवढीच रोख रक्कम घेऊन पसार होतात.
ऑनलाईन पैसे तत्काळ खात्यात जमा होत असल्याने कर्मचाऱ्यांना संशय येत नाही. मात्र, संशयितांनी वापरलेले पैसे सायबर गुन्ह्यांमधील असल्याने काही दिवसांतच परराज्यातील सायबर सेलच्या निर्देशानुसार बँकेकडून पेट्रोल पंप चालकांचे करंट अकाउंट हाेल्ड केले जाते.

ताज्या बातम्या

Nashik News : कंपनीतील अपघातात तरुणाचा मृत्यू

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सातपूर (Satpur) येथील एका कंपनीत (Company) काम करतांना मशिनमध्ये डोके अडकून एका २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली...