शिर्डी | Shirdi
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या शिर्डीमध्ये उन्हाच्या तीव्र लाटेमुळे ‘इतना सन्नाटा क्यू है भाई?’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहे. शिर्डीत दररोज हजारो भाविक साई दर्शनासाठी येतात. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची अपेक्षा असते. मात्र यावर्षी तापमानाने विक्रमी पातळी गाठल्याने अनेक भाविकांनी प्रवास टाळत घरातच राहणे पसंत केले आहे. जिथे शिर्डीत शांतता दिसतेय, तिथे महाबळेश्वर, पाचगणी आणि लोणावळा सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.
याठिकाणी हॉटेल्स आणि लॉजिंग हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे. शिर्डीत भाविकांची संख्या घटल्याने हॉटेल व लॉजिंग, कापड दुकानदार, नॉव्हेल्टी फेरीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक हे सर्वच आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. वीजबिल, बँकेचे हप्ते, कामगारांचे पगार आणि कर भरणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने सध्या वातानुकूलित खोल्यांना मागणी वाढली असली तरी सर्वसामान्य भाविक परवडणार्या हॉटेल्सकडे वळतात. परिणामी अनेक साधी लॉजिंग व हॉटेल्स रिकामीच असल्याचे वास्तव आहे.
हवामान अंदाजानुसार उष्णतेची लाट अजून काही आठवडे कायम राहू शकते. त्यामुळे शिर्डीतील व्यावसायिकांना अजून किमान दीड महिना या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. सध्याची शांतता ही तात्पुरती असली तरी तिचा परिणाम मोठा आहे. भाविकांची घटलेली संख्या आणि वाढते तापमान यामुळे शिर्डी व परिसरातील व्यवसायिकांचे अर्थचक्र ठप्प झाल्याने व्यवसायिक मोठे चिंतेत आहेत. साईनगरीवर परिसरातील जवळपास 60 गावांचे अर्थचक्र अवलंबून आहेत. हॉटेल, लॉजिंग, फुल हार, प्रसाद व नॉवेल्टीज दुकान, ट्रॅव्हल ऑफिस तसेच खासगी वाहनातून भाविकांना तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ आदी ठिकाणी घेऊन जाण्यासाठी हजारो वाहने अशा अनेक व्यवसायांवर परिसरातील नागरिक आपल्या कुटुंबांची उपजीविका चालवतात. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने उन्हाळ्याची सुट्टी असताना देखील शिर्डीत साईभक्तांची संख्या कमी होत असल्याने यावर आपल्या प्रपंचाची रोजीरोटी अवलंबून असलेल्या नागरिकांना मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे.
दिवाळी व उन्हाळा सुट्टी तसेच रामनवमी, दसरा व गुरुपौर्णिमा अशा या उत्सवानिमित्त शिर्डीत भाविकांची प्रत्येक वर्षी गर्दी होते. परंतु मागील काही वर्षांपासून उष्णतेची मोठ्या प्रमाणात तीव्रता जाणवत असल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत भाविकांची दिवसेंदिवस गर्दी कमी होत असल्याने व्यावसायिकांचा देखील हिरमोड होत आहे. परिणामी बँकेचे हप्ते अनेकांना देणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे सध्या सुट्ट्या असून देखील उष्णतेची तीव्रता ज्यादा प्रमाणात असल्याने शिर्डीत ‘इतना सन्नाटा क्यू है भाई?’ या शोले पिक्चरच्या डायलॉगची आठवण नागरिकांना आली आहे.





