शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत साई साक्षीने व त्यांच्याच भूमीतून करण्यासाठी देश विदेशातील भाविकांनी साईनगरीत गर्दी केली. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साईनामाच्या गजराने व फटाक्यांच्या आतषबाजीने साईनगरीचा आसमंत उजळून निघाला. नववर्षाचा श्रीगणेशा साईदर्शनाने शिर्डीतून करण्यासाठी अनेक भाविक आवर्जून साईनगरीत येत असतात. 31 डिसेंबरच्या रात्री साईमंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. 31 डिसेंबरला सायंकाळी सरत्या वर्षाची शेवटची आरती झाली़ 1 जानेवारीला दुपारी नववर्षातील साईबाबांची पहिली आरती होईल. नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी नटली असून समाधी मंदिर व परिसरात बंगलोर येथील साईभक्त बी. ए. बसवराज यांच्या देणगीतून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. साईमंदिर व परिसरातील फुलांची सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. संपूर्ण साईनगरीत दिवाळीचा माहोल असून नगरपरिषदेसह अनेक हॉटेल्स, लॉजेस, रेस्टॉरंट वरील विद्युत रोषणाईने अवघी साईनगरी उजळून निघाली आहे.
31 डिसेंबरला दुपारनंतर भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला़ अनेक पदयात्रीही सायंकाळपर्यंत शिर्डीत डेरेदाखल झाले. सायंकाळनंतर सगळे रस्ते भाविकांनी फुलून गेले. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साईमंदिरात साईभक्तांनी एकच गर्दी केली. यात अनेक व्हीव्हीआयपींचाही समावेश होता. साईनामाच्या गजराने अवघा परिसर दणाणून गेला शहरात बाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विविधरंगी आतषबाजीने अवघे आकाश उजळून निघाले़ रात्रभर भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. द्वारकामाई व चावडी मंदिर परिसरातही भाविकांनी मोठी गर्दी केली. साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण प्रमुख रोहिदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्रसादालय, भक्तनिवासासह विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत.
साईसंस्थानने वर्षारंभानिमित्त शिर्डी महोत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. साईसंस्थानने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रसादालय रात्री एक तास अधिक सुरू ठेवले. मंदिर परिसरात व भक्तनिवासांच्या परिसरात हजारो चौरस फुटांचे मंडप उभारण्यात आले आहेत. ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्राची रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी अतिरीक्त पोलीसदल तैनात करण्यात आले आहे. कोलकत्ता येथील सुजय खंडेलवाल या भाविकाने येथे रिशु वडा नावाने भाविकांना साई दरबारी नववर्षाच्या स्वागताची मेजवानी उपलब्ध करून दिली. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.