शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे 2014 मध्येच एनडीएसोबत आले असते, तर कदाचित शरद पवार हे देशाचे राष्ट्रपती झाले असते. परंतु, त्यांनी त्यावेळी तो निर्णय घेतला नाही. तरीही, भविष्यात ते एनडीएसोबत आले, तर त्यांचे नेहमीच स्वागत असेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रिपाईचे नेते काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दीपक गायकवाड, कार्याध्यक्ष चांगदेव जगताप, प्रदीप बनसोडे आदींसह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत येण्याची शक्यता निर्माण झाली होती, असे सांगत आठवले म्हणाले की, शरद पवार यांचे वय लक्षात घेता ते सक्रिय राजकारणात कमी भूमिका घेतील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व खासदार-आमदार अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करतील, अशी चर्चा झाली होती. त्या काळात सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद देण्याबाबतही बोलणी झाली होती, मात्र काही कारणांमुळे तो विषय पुढे गेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अजेंडा केवळ विकासाचा असून त्यांनी स्वतः बारामतीत शरद पवारांना आपले गुरू मानले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आठवलेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. 2019 मध्ये महायुती सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे ही ठाकरे यांची ऐतिहासिक चूक होती. शिवसेनेतील सध्याची फूट ही त्याच चुकीचा परिणाम आहे, असे ते म्हणाले. तसेच अयोध्या राम मंदिर परिसरात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारनक समिती नेमली असून, दोषींवर कठोर कारवाई सुरू आहे. यात भाजपचा कोणताही हस्तक्षेप नाही.
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणावर बोलताना आठवले म्हणाले की, आरपीआयची भूमिका कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये अशी आहे. वास्तविक पाहता उपवर्गीकरणाची तशी आवश्यकता नाही. मातंग समाजासारख्या घटकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने त्यांना आरक्षणाचा पुरेसा फायदा मिळत नाही. यासाठी सरकारने विशेष आराखडा तयार करावा. जर उपवर्गीकरण होणारच असेल, तर ते जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार व्हावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, महाराष्ट्रातील अतिवृष्टीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून त्यांनी नद्या जोड प्रकल्पाची आग्रही मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले हे स्वप्न पूर्ण होणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी मुंबईची ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे बदलण्याची गरज व्यक्त केली.
रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत कविता सादर करत विरोधकांवर टोलेबाजी केली. आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले: गाव गाव की बोल रही है दादी,2029 में भी प्रधानमंत्री बनेंगे नरेंद्र मोदी. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लग्नाच्या मुद्यावरून चिमटा काढताना त्यांनी पुढील ओळी सादर केल्या, ज्यामुळे पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. गाव गाव की पूछ रही हैं दादी,राहुल गांधी कब करेंगे शादी?




