संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
येत्या 17 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त होणार्या मिरवणुकीच्या परवानगीवरून संगमनेरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद रंगला आहे. या वादात काँग्रेसनेही उडी घेऊन आपल्यालाही बसस्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा आणि दिवसभर भव्य दिव्य मंदिराची उभारणी करून दर्शन सोहळा करावयाचा आहे, त्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केल्याने पोलीस प्रशासनापुढे कोणाला परवानगी द्यावी याचा मोठा पेच उभा राहिला आहे.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी शिवजयंती सोहळा साजरा होतो, मात्र शिवसेनेत दोन गट पडल्याने दोन्ही गटांनी पोलीस प्रशासनाकडे मिरवणुकीसाठी परवानगी मागितल्याने पोलिसांपुढे मोठा पेच उभा राहिला आहे. सर्वांनी एकत्र येऊन भव्य दिव्य शिवजयंती साजरी करावी अशी प्रशासनाची इच्छा असली तरी राजकीय कंगोरे सोहळ्याला लागत असल्याने या वादात आता प्रशासन काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाला परवानगी असते, त्या धर्तीवर आम्हाला परवानगी देण्याची मागणी माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.
तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे आमचेच असल्याने हा शिवजयंती सोहळा करण्याची परवानगी आम्हालाच मिळावी अशी मागणी शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रमेश काळे आणि विनोद सूर्यवंशी यांनी केली. दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनीही आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. या दोन्ही शिवसेना गटांतील भांडण चालू असतानाच काँग्रेसनेही आम्हाला शिवजयंती सोहळा साजरा करायचा असल्याने आम्हालाही परवानगी देण्याची मागणी शहर पोलिसांकडे केली आहे. यावर चर्चा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या दालनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मात्र या बैठकीतही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आम्हालाच शिवजयंती सोहळा मिरवणूक काढण्याची परवानगी देण्याची मागणी केल्याने कोणत्याच निर्णयाविना ही बैठक आटोपती घ्यावी लागली. शिवजयंती सोहळा सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी भावना डॉ. सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचे मार्गदर्शन घेऊन पोलीस प्रशासन आपला निर्णय कळवेल अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दोन्ही शिवसेना कार्यकर्ते आणि काँग्रेस नेत्यांना दिली आहे.