Wednesday, June 17, 2026
HomeनगरRahata : शिव महापुराण कथेतील चोरट्यांचा प्लॅन फेल, 28 पॉकेटमार जेरबंद

Rahata : शिव महापुराण कथेतील चोरट्यांचा प्लॅन फेल, 28 पॉकेटमार जेरबंद

23 महिलांचा समावेश || आंतरराज्यीय गुन्हेगार गजाआड

राहाता |प्रतिनिधी| Rahata

लाखो भाविक जमलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेमध्ये भाविकांचे खिसे कापणे, सोन्याच्या चैन तोडणे आणि जबरी चोरी करण्याच्या तयारीत आलेल्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळ्यांना शिर्डी पोलिसांनी मोठ्या कारवाईत जेरबंद केले आहे. या विशेष मोहिमेत पोलिसांनी एकूण 28 आरोपींना अटक केली असून त्यामध्ये 23 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे.

- Advertisement -

पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा दि. 12 ते दि. 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान निर्मळ पिंप्री येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकार होण्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष पथके तयार केली. पोलिसांनी दिवसरात्र पायी गस्त ठेवून संशयित महिला व पुरुषांवर बारीक नजर ठेवली. संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध दरोड्याच्या तयारीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दि. 11 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2025 या काळात शिर्डी आणि लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींना पकडले. पकडलेल्या या चोरट्यांमध्ये राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या लोकांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्व आरोपींवर भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 310 (4) आणि 310 (5) (दरोड्याची तयारी) अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व 28 आरोपींना पुढील कारवाईसाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.

या कारवाईमुळे धार्मिक कार्यक्रमांसाठी आलेल्या भाविकांचे मौल्यवान दागिने आणि वस्तू चोरीला जाण्यापासून वाचले असून पोलीस अधिकार्‍यांच्या सतर्कतेमुळे मोठे नुकसान टळले आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली.

ताज्या बातम्या

Deolali Pravara : पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा हवालदिल

0
देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी परिसरात पावसाचा एकही थेंब न पडल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत आकाशात...