नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरवर अखेर ठाकरे गटाने मौन सोडले आहे. ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्या कथित ऑपरेशन टायगरची हवा काढून घेतली आहे. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे गटाचे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने आमच्याकडे येणार आहेत, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे गटातील एकूण ९ खासदारांपैकी ६ खासदार हे एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आज (७ फेब्रुवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, अरविंद सावंत, अनिल देशाई, संजय जाधव यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
ठाकरेंचे खासदार काय म्हणाले?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठाकरेंच्या खासदारांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार संजय राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह बाकी खासदार उपस्थित होते. “मुळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यांचे सरकारमध्ये आपापसात गंभीर वाद सुरू आहेत. यावेळी लक्ष वळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्या प्रयत्नांनुसार जाणीवपूर्वक आज सकाळी सात वाजल्यापासून कोणीतरी बातम्या सोडल्या आहेत. सरकारमध्ये येऊन सुद्धा रोज नवीन-नवीन बातम्या दिल्या जात आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. अशा बातम्या सातत्याने दिसत असल्याने मुद्दाम ही पुडी सोडण्यात आलेली आहे”, असे म्हणत लोकसभा खासदार अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली.
पुढे ते म्हणाले, आमचे सर्व खासदार उपस्थित होते. आजही सर्व उपस्थित आहे. आमची वज्रमूठ मजबूत आहे. टायगर जिंदा आहे. टप्प्प्याटप्प्याने त्यांच्यातीलच एक माणूस आमदार घेऊन भाजपकडे जाणार होता. पुन्हा आमच्या खासदार आणि त्यांच्या निष्ठेबद्दल मन कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा निषेध करतो. हे लोकं कठिण प्रसंगात राहिलेले हे खासदार आहेत. काही चढउतार होऊ द्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहोत…”, असे अरविंद सावंत म्हणाले.
“आम्हाला कुणाचाही फोन आलेला नाही. फोन आल्याच्या बातम्या खोट्या आहेत. १०० टक्के आम्ही कुठेच जाणार नाही. पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आहे कळू द्या. बांगलादेशात काल हिंदूंवर हल्ला झाला. अमेरिकेत जे काही घडले, आपल्या लोकांना बेड्या ठोकून देशात आणले गेले. इथे अमृतसरमध्ये अमेरिकेच्या मिलिट्रीचे विमान उतरते हा देशाचा अपमान आहे. हे तिकडे डुबकी घेत आहेत. त्यांना हिंदुत्वाशी काही घेणेदेणे नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. काल अमेरिकेने देशाचा अपमान केला आहे. छोट्या देशांनी अमेरिकेला डोळे वटारून सांगितले. आमचे विमान येईल आणि आमचे लोक घेऊन जाईल. पण तुम्हाला का सांगता आले नाही”, असेही अरविंद सावंत म्हणाले.
“तुम्ही ट्रम्पचा हात मिळवून प्रचार केला होता. तेव्हा ट्रम्पचा पराभव झाला. तुम्हाला ट्रम्पच्या निमंत्रणाची वाट पाहावी लागली होती. झोंबतेय तुम्हाला. आमचे खासदार चिडले आहेत. मतदारसंघात आमच्याबद्दल नको त्या चर्चा होत असल्याचे त्यांनी म्हटलेय. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही. आमचे हिंदुत्व बावनकशी आहे. ढोंगी नाही. जो राष्ट्रासाठी प्राण देईल तो आमचा हिंदू आहे”, असेही अरविंद सावंत यांनी म्हटले.
खरे तर, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठा दावा केला होता. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात येतील, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाल्याचे देखील बोलले जातेय. संसदीय अधिवेशनाआधीच हा पक्षप्रवेश होईल, असे सांगितले जातेय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा