मुंबई | Mumbai
प्रचंड बहुमताने महायुती सत्तेवर आली असली तरी तिन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटप, निर्णयाधिकारावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे खच्चीकरण सुरू असल्याचे म्हटले जात असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदनाची दोरी मंत्री अदिती तटकरे यांच्या हातात देण्याचा निर्णय झाल्यामुळे मंत्री भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला त्यांनी दांडी मारली. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बैठकीला गैरहजर आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे १० ऑगस्टला श्रीनगर दौऱ्यावर गेले ते अजून परतलेले नाहीत. तर गोगावले दिल्लीमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे महायुतीत नेमकं काय चालले आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असणारे भरत गोगावले हे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे देखील अनुपस्थित राहणार आहेत.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेने (शिंदे) दावा केला आहे. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेनेचे (शिंदे) मंत्री भरत गोगावले यांच्यात कित्येक महिन्यांपासून वाद सुरु आहे. अशातच रायगड जिल्ह्यात येत्या स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. यामुळे पालकमंत्रीपदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
आपण नाराज नाही-गोगावले
दरम्यान, राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले. आपला दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित होता. त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये आपण हजर राहणे शक्य नव्हते. एखाद्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने पालकमंत्री ठरत नसतो, असेही गोगावले यांनी सांगितले.
दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर आहेत त्यामुळे ते बैठकीला गैरहजर आहेत. तर पालकमंत्रीपदाचा आग्रह धरलेले भरत गोगावले दिल्लीत आहेत. त्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरुन तर्कवितर्क लावले जात आहेत. नाशिक जिल्हा पालकमंत्रीपदासाठी आग्रही असलेले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




