मुंबई | Mumbai
येत्या काही काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. मुंबईत बीएमसीची निवडणुक ही पार पडणार आहे. विषेशत: मुंबई आणि मुंबई उपनगरात मराठीसह उत्तर भारतीय मतदार देखील आहेत. यामुळे उत्तर भारतीय मतदारांचे मन राखण्यासाठी तसेच त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सभा घेतल्या जात आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत अमराठी मते ही निर्णायक ठरू शकतात. यामुळे राजकीय पक्षांचा डोळा या मतांवर असतो. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. उत्तर भारतीय समूहाच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश सुर्वे यांनी अमराठी लोकांचे गुणगाण गाताना चक्क मराठी मेली तरी चालेल, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानाने येत्या काळात त्यांच्यावर टीकेची झोड उठली जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत अमराठी लोकांनी मतदान करावे या उद्देशाने त्यांनी चक्क आईच्या मरणाची इच्छा व्यक्त करून अमराठी मावशी जगावी, असा आशावाद व्यक्त केला.
प्रकाश सुर्वे नेमके काय म्हणाले?
मराठी ही मातृभाषा आहे, माझी आई आहे. पण उत्तर भारत ही माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल परंतु मावशी मरता कामा नये. कारण मावशी जास्त प्रेम करते. खरे तर आईपेक्षाही मावशी जास्त लळा लावते, अशी मुक्ताफळे प्रकाश सुर्वे यांनी उधळली. उत्तर भारतीय एका सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे, यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीय मतदारांना खूश करण्यासाठी, त्यांची मते मिळवण्यासाठी त्यांनी हे विधान केले आहे अस आता बोलले जात आहे.
मनसेची टीका
“माय मरो मावशी जगो ही म्हण, जेव्हा बाळ लहान असताना गेली तर मावशी आहे असा त्याचा अर्थ आहे. पण यांनी ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे ती मतं मिळवण्यासाठी लाचारी असून, स्वत:च्या आईलाही मारायला निघाले आहेत अशी प्रवृत्ती आहे. मतांसाठी हे सर्व केले जात आहे,” असा संताप मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, “तेजस्वी यादव सांगतात आम्ही मुंबईत उत्तर भारतीय भवन बांधू. सगळ्यांना उत्तर प्रदेश आणि काहींना मुस्लिमांबाबत अचानक प्रेम आले आहे. निवडणूक आली की हे प्रेम येते. कारण त्यांना ही मतं हवी असतात आणि हे मिळणार हे माहिती असतं. मराठी मतदार सर्वांमध्ये विभागलेला असतो. पण हे उत्तर भारतीय मतदार एकगठ्ठ मिळणार हे माहिती असताना त्यांचे लाड पुरवण्यासाठी ही विधाने केली जातात”.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





