Friday, May 3, 2024
Homeनगरशिवसेनेचे तालुका प्रमुख जर्नादन आहेर यांचा राजीनामा

शिवसेनेचे तालुका प्रमुख जर्नादन आहेर यांचा राजीनामा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर तालुका शिवसेनेचे प्रमुख जर्नादन म्हातारबा आहेर यांंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

त्यांच्या राजीनाम्याचे कारण समजू शकले नाही. या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे.

गेल्या काही महिन्यापासून संगमनेर शहर व तालुका शिवसेनेला मरगळ आली आहे. पक्षाच्या माध्यमातून एकही आंदोलन अथवा समाज कार्य होत नसल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहे. सेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचेही तालुक्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजीची भावना व्यक्त होत आहे.

शहर आणि तालुक्याच्या पदाधिकार्‍यांमध्ये बदल करावे, अशी मागणी शिवसैनिकांनी अनेकदा केली होती. मात्र याकडे संपर्क प्रमुखांनी व इतर वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. संगमनेर तालुका प्रमुख जनार्दन आहेर हे गेल्या चार वर्षाहून अधिक काळापासून तालुक्याचे काम पहात आहे. त्यांनी शिवसेनेकडुन विधानसभेची निवडणूकही लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला होता.

निवडणूकीनंतर ते पक्षाच्या कामकाजापासून दूरच होते. त्यांनी यापूर्वी राजीनामा देण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र तो स्विकारण्यात आला नाही. काही दिवसापूर्वी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याचे खरे कारण मात्र समजू शकले नाही.

महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार दोन्ही काँग्रेसच्या पाठबळावर स्थापन झाले. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आयुष्यभर ज्यांच्या विरोधात काम केले त्यांच्यासोबत युती करणे या कार्यकर्त्यांना मानवले नसल्याचे दिसत आहे. यामुळे अनेकजण पक्षाच्या कामकाजापासून दूर असल्याचे दिसत आहे.

तालुका प्रमुख आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणार्‍या पदासाठी काही नावे समोर आली आहे. गुलाब भोसले, शरद पावबाके, भाऊसाहेब हासे यांच्यासह काही नावांची चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या