Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजShivsena UBT Crisis : "आता जो राडा व्हायचा तो होईल, राज्यातील जनता...";...

Shivsena UBT Crisis : “आता जो राडा व्हायचा तो होईल, राज्यातील जनता…”; संजय राऊत फुटीर खासदारांवर संतापले

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे सेनेचे खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे.काल (मंगळवारी) रात्रीपासून या चर्चांना जोर आला असून, ठाकरे सेनचे ९ पैकी ६ खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) दिल्लीत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेत या घडामोडींवर भाष्य केले.

- Advertisement -

यावेळी राऊत म्हणाले की, “अशा पद्धतीने पक्ष तोडले, फोडले जात असतील, तर या देशात निवडणुका लढण्याला अर्थ नाही. आमच्या खासदारांची जी नावे येतात ते कुठे आहेत माहीत नाही. कुणी म्हणतात, दिल्लीत आहेत. कुणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहे. हे सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले. आधी फूट पडली, तेव्हा मोदींच्या नावावर निवडणूक लढवली. मॅनडेटच्या विरोधात आहे, असं सांगितलं जात होतं. आता जे खासदार आमदार असतील ते पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निवडून आले. आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कुणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही”, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले “उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत यांना सर्व काही दिले. रक्त,पैसा दिला, मेहनत घेतली. तरीही त्यांच्याबाबत अशा बातम्या येत असतील तर त्याचे त्यांनी खंडन करावे. या क्षणी कुणावर आरोप करणार नाही. मागे जे झालं, त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेना तर कदापि गप्प बसणार नाही,जो राडा व्हायचा तो होईल. ही गांडूगिरी आणि नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही. राज्यातील जनता चूप बसणार नाही. ज्यांना जायचं त्यांनी राजीनामा देऊन जावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

मातोश्रीवरच्या बैठकीत खासदारांनी शपथा घेतल्या

यावेळी संजय राऊत म्हणाले की, मातोश्रीवर १४ जूनला झालेल्या बैठकीत लोकसभेचे चार खासदार उपस्थित होते. यामध्ये अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील यांची हजेरी होती. उर्वरित पाच जण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. एका खासदाराने चारवेळा साईबाबांची शपथ घेतली. मी तुमच्यासोबत आहे, साईबाबांची शपथ घेतो; माझी बायको आजारी आहे, साईबाबांची शपथ घेतो, मी दोन दिवसांत भेटायला येतो, साईबाबांची शपथ घेतो, मी मरेपर्यंत तुमच्यासोबत राहतो, साईबाबांची शपथ घेतो, असे या खासदाराने म्हटले. तर एकाने त्याच्या मुलीची तर आणखी एकाने आई भवानीची शपथ घेतली. अशा शपथा घेतल्यावर विश्वास ठेवणे अनिवार्य होते, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....