मुंबई | Mumbai
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीत एनडीएने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि महागठबंधन यांना यश मिळू शकलेले नाही. १०० चा आकडाही महाआघाडीला गाठता आलेली नाही. एनडीएने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार हे निश्चित आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या निकाला वर प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर टीका केली आहे.
बिहार विधानसभा निवडणूक निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट काँग्रेसवर घणाघात केला. ‘काँग्रेसने स्वत:ची वृत्ती बदलली पाहिजे. काँग्रेसने मोठ्या चुका केल्या आहेत. त्यांनी आपल्या पराभवातून शिकायला हवे.’, असे स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. तसेच, त्यांनी यावेळी, ‘महाराष्ट्रात निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले असते तर राज्याच चित्र वेगळे असते.’, अशी देखील खंत त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस तेजस्वी यांच्यापेक्षा कमी पडला हे मान्य केले पाहीजे
पराभव झाला आहे हे मान्य केले पाहिजे. त्यात काही दुमत असण्याचे कारण नाही. भारतीय जनता पार्टीने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यासाठी लावलेला वेळ हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचे जे जागावाटप झाले त्यात अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशी पर्यंत चालले होते. राहुल गांधींची जी मतचोरीबाबतची यात्रा होती तिला मिळालेला प्रतिसाद पाहून तेजस्वी यादव यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करणे फायद्याचे ठरले असते. पण ही चूक त्यावेळी केली आहे. फक्त एवढंच नाही पण काँग्रेस, तेजस्वी यादव यांचा पक्ष कमी पडला हे मान्य केले पाहिजे. बाकीचे मुद्दे आहेतच पण हे लक्षात घेतले पाहिजे.
पुढे ते म्हणाले, ‘काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे. काँग्रेसने मोठ्या चुका केल्या असून त्यांनी आपल्या पराभवातून शिकायला हवे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची उमेदवार ठरवले असते तर परिस्थिती वेगळी असती. ती चुकी बिहारमध्ये केली.
काँग्रेस जागावाटपावेळी मोठा वाटा मागते…
तसेच, ‘काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या आहेत. मतदार यादीत घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटपमध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो. माझे मत स्पष्ट आहे. यामुळे मोठे नुकसान होते. बिहारचे गणित महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे. राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे. मात्र जागावाटप अखेरच्या दिवशीपर्यंत होत असेल तर गंभीर आहे. याचे परिणाम निकालावर होतो. महाराष्ट्रात निवडणूक वेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले असते. जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते. जी चूक महाराष्ट्रमध्ये झाली तीच बिहारमध्ये झाली. त्यामुळे काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी.’, असे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष यांच्याबरोबर जाण्याची आमची इच्छा आहे. पण छोट्या गावांमध्येही जर जागावाटपाची चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत चालत असेल तर निवडणुकीतली मजा निघून जाते. मला वाटते की निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे तो या धोरणामुळे मिळत नाही आणि त्याचा परिणाम निवडणूक निकालावर होतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




