संगमनेर (तालुका प्रतिनिधी)
जवळे कडलग येथे एका चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या अत्यंत गंभीर घटनेची दखल घेऊन वन विभागाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या या बिबट्याला ठार मारण्याचे (Shoot to Kill) लेखी आदेश नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक (PCCF) कार्यालयाने जारी केले आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी याप्रकरणी वनमंत्री आणि वन विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून केलेल्या पाठपुराव्यानंतर बिबट्याच्या दहशतीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल पडले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नाशिक येथील मुख्य वन संरक्षकांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांचे एक स्वतंत्र पथक तातडीने जवळे कडलग परिसरात कार्यरत करण्यात आले आहे.
जवळे कडलग येथे शनिवारी रात्री सिध्देश कडलग या चार वर्षीय बालकावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या दुर्दैवी घटनेत सिध्देशला आपले प्राण गमवावे लागले. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या ग्रामस्थांच्या संतापाला या घटनेने वाचा फुटली. बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाल्याशिवाय सिद्धेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी कठोर भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटना घडल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कडलग कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना देत, या भागातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येथे उपस्थित असलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. जवळे कडलग येथील घटनेसह, संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या दहशतीचे गंभीर वास्तव त्यांनी वनमंत्र्यांसमोर मांडले आणि त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
यानंतर जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी थेट नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. जवळे कडलग येथील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, सर्व उपाययोजना अयशस्वी ठरल्यास, बिबट्याला ठार मारण्यासाठी स्थानिक वन अधिकाऱ्यांना तातडीने परवानगी देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यास सांगितले.
विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर प्रधान मुख्य वन संरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी तातडीने नाशिकच्या मुख्य वन संरक्षकांना लेखी आदेश काढले आहेत. या आदेशानुसार, जवळे कडलग येथे मानवी जीवितास त्रासदायक ठरणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी भारत सरकारच्या सर्व नियमांना अधीन राहून सर्वप्रथम सर्वतोपरी प्रयत्न करावेत. मात्र, हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यास, या बिबट्यास ठार मारण्यास (Killing of Animal) या आदेशान्वये मंजुरी देण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, मानवी वस्तीजवळ वाढलेला धोका लक्षात घेऊन, नाशिकच्या मुख्य वन संरक्षकांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांची एक विशेष टीम पाचारण करण्याचे आदेशही नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाने जारी केले आहेत. वन विभागाच्या या कठोर आणि निर्णायक भूमिकेमुळे जवळे कडलग व परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.




