Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीक्षेत्र देवगड येथे 7 लाख भाविकांनी घेतले दर्शन

श्रीक्षेत्र देवगड येथे 7 लाख भाविकांनी घेतले दर्शन

देवगड फाटा | वार्ताहर| Devgad Phata

नेवासा तालुक्यातील गुरुदेव दत्त पीठ श्रीक्षेत्र देवगड येथे श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने 7 लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. सायंकाळी 6 वाजता गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी व शंखनाद तसेच तोफेची आतषबाजी व फुलांची उधळण करत भजन व पाळणा गीत गात भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला

- Advertisement -

यावेळी भास्करगिरी महाराजांनी आलेल्या संत महंतांचे स्वागत केले. बोलताना सांगितले की राष्ट्रीय ऐक्य जोपासून देशाचे वैभव वाढविण्यासाठी एकोप्याने प्रयत्न करा,श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने दत्त जन्म सोहळा परंपरेनुसार साजरा होत आहे असे सांगितले.

दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी पुष्पांनी सजविलेल्या व्यासपीठावरील पाळण्यामध्ये भगवान दत्तात्रयाची मूर्ती ठेवण्यात आली होती.परिसराची पुष्पांनी सजावट करण्यात आली होती. यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी भास्करगिरी महाराज, उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्याहस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली. तर दत्त जन्म सोहळा सर्वांना पहाता यावा म्हणून दत्त मंदिर प्रांगणात 2 भव्य स्कीन लावण्यात आल्या होत्या

पहाटे गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते महाभिषेक घालण्यात आला.दत्तजयंती असल्याने पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

भाविकांना रांगेत व शिस्तीत दर्शन घेता यावे म्हणून नेवासा पोलिसांचे पथक, होमगार्ड पथक,पोलीस निरीक्षक विजय करे यांनी नियोजन बंदोबस्त केल्याने यावर्षी वाहतुकीची कुठेही कोंडी झाली नाही.

श्री दत्तजयंती निमित्त श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व देवगड दत्त पिठाचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळच्या सुमारास मंदिर प्रांगणात पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळाचे पथक प्रदक्षिणा मिरवणुकीत सहभागी झाले होते. दत्तजयंती निमित्ताने यज्ञ मंडपात आयोजित दत्तयागाची सांगता भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देऊन करण्यात आली.

यावेळी भगवान दत्तात्रयांच्या मुख्य मंदिरासह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिध्देश्वर मंदिर,मुख्य प्रवेशद्वारासह नव्याने देवगड प्रांगणात बांधण्यात आलेल्या दाक्षिणात्य शिल्पकला साकारलेल्या प्रवेशद्वारावर केलेली भव्य विद्युत् रोषणाई उपस्थित भाविकांचे आकर्षण ठरली होती. श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त देवगड येथे मोठी यात्रा भरली होती यात्रेत विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती.यात्रेत आलेल्या दुकानदारांना व्यवसायासाठी श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने जागेची व्यवस्था करण्यात आली होती.नेवासा,नगर,श्रीरामपूर, गंगापूर या एस. टी. आगारातून भाविकांसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.पहाटेपासून रात्रीपर्यंत भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दीने मोठा उच्चांक केला होता.

यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळ्याच्याप्रसंगी नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,माजी आमदार पांडुरंग अभंग, भास्करगिरी महाराजांच्या मातोश्री सरुबाई पाटील, महंत कैलासगिरी महाराज, श्रीराम साधना आश्रमाचे सुनीलगिरी महाराज, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, विश्व हिंदू परिषदेचे आप्पासाहेब बारगजे, डॉ. जनार्धन महाराज मेटे, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अ‍ॅड. सुनील चावरे, पोलीस निरीक्षक विजय करे, गंगापूर येथील युवा नेते संतोष माने, भाजपचे नितीन दिनकर, उद्योजक मोहनराव आहेर, बजरंग विधाते, सरपंच अजय साबळे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या