अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांत घरफोड्या व चोरीचे गुन्हे करणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तीन घरफोड्यांसह दोन चोरीचे असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीच्या गुन्ह्यांतील 27 हजार 500 रूपये किमतीचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील घरफोडीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये आणि पोलीस अंमलदार राहुल व्दारके, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, अरूण मोरे, भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे यांचे पथक तपासकामी तयार केले होते.
तपास पथकाला माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा योगेश हिवर्या काळे (वय 20, रा. बिटकेवाडी, ता. कर्जत) याने साथीदारांच्या मदतीने केला असून, ते नेवासा तालुक्यातील गिडेगाव परिसरात आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने शोध घेऊन योगेश काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने साथीदार एसआरप्या शिंदुश्या काळे (रा. बिटकेवाडी) आणि गवळीनाथ शांतीलाल काळे (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती दिली. ते दोघे पसार आहे.
पोलिसांनी योगेशकडे चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता, काही दागिने पत्नी अजाला दिल्याचे, तर काही दागिने सलबतपूर (ता. नेवासा) येथील दीपक सुभाष कपिले याला विकल्याचे योगेशने सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दीपक कपिले आणि अजाला काळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पंचांसमक्ष 27 हजार 500 रूपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.




