अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रयत शिक्षण संस्थेचे कर्मचारी भाऊसाहेब ऊर्फ राजनारायण दत्तात्रय पांडुळे (वय 52, रा. सारसनगर, अहिल्यानगर) यांनी अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील केडगाव शिवारातील नील हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (19 ऑक्टोबर) ही घटना उघडकीस आली. कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भाऊसाहेब ऊर्फ राजनारायण पांडुळे हे रयत शिक्षण संस्थेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सोमवारी त्यांनी केडगाव शिवारातील नील हॉटेलच्या खोलीत गळफास घेतल्याची घटना समोर आली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांचे नातेवाईक साई साळवे (रा. मंगलगेट, अहिल्यानगर) यांनी त्यांना दुपारी तीनच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर रूग्णालयात नियुक्त पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
रूग्णालय पोलिसांकडून ही माहिती कोतवाली पोलीस ठाण्याला कळविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, पांडुळे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी कोतवाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




