श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदीप्रकरणी नाशिक विभागाचे उपसंचालक महेश इंगळे यांच्याकडे सामाजिक कायकर्ते टिळक भोस यांनी गुरुवारी (दि.23) तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे, श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयातील गैरकारभारामुळे नागरिक हैराण झाले असून कर्मचारी गोरख संतराम चव्हाण (निमतानदार) व राहुल गोरक्षनाथ गाडे (परीरक्षक भुमापक) यांच्या कमकाजाविषयी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या तक्रारी असून या दोन्ही कर्मचार्यांनी अनेक लोकांकडून पैसे घेतले आहेत. अनेकांची प्रकरणे गहाळ केली आहेत. जाणूनबूजून कामे देखील प्रलंबित ठेवली आहेत. याबाबत श्रीगोंदा कार्यालयातील उपअधीक्षक सुहास जाधव यांच्याकडे अनेकदा तक्रार केली आहे. 12 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक येथील उपसंचालकांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र कोेणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी पुन्हा तक्रार करण्यात आली.
दरम्यान, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून कुठलेही काम वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन कार्यालयांच्या कामकाज सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. गावठाण हद्दीतील व शेतीचे नगर भूमापन उतारे, मोजणी नकाशा, मोजणी प्रकरणे, फाळणी नकाशा, वारस, खरेदी खत दस्तावेज व बक्षीस पत्र नोंदणी बरोबरच विविध उतारे व नकाशे नागरिकांना सांगितलेल्या वेळेत मिळत नसून भूमी अभिलेख कार्यालयात येणार्या नागरिकांना कर्मचार्यांकडून योग्य ती माहिती मिळत नाही. त्यांना उर्मटपणाची वागणूक दिली जात असल्यामुळे या कार्यालयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
गोरख चव्हाण, राहुल गाडे या कर्मचार्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील अनेक प्रकरणे गहाळ केली आहेत. चव्हाण यांनी शासकीय कागदपत्रे आपल्या घरी नेऊन ठेवली आहेत. लाखो रुपयांचे रोव्हर मशीन देखील गायब केले होते. याबाबतची तक्रार उपसंचालकांकडे केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास नाशिक येथे उपसंचालकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कायकर्ते टिळक भोस यांनी सांगितले.