Friday, May 3, 2024
Homeनगरकांदा बाजार भावाची कोंडी फुटेना!

कांदा बाजार भावाची कोंडी फुटेना!

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील शेती उत्पादनात यंदा कांदा (Onion) क्षेत्र सर्वाधिक राहिल्याने आता रब्बी हंगामातील कांदा काढणी जोमात असताना कांद्याचे भाव मात्र अवघ्या दहा रुपये किलोच्या पुढे जात नसल्याने झालेला उत्पादन खर्च ही वसूल होत नसताना नाफेड मार्फत तालुक्यातील काही कांदा खरेदी करण्यात येणार असला तरी हे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होण्यास असंख्य अडचणी आल्या आहेत.

- Advertisement -

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही बहुतांशी व्यापारी कांदा खरेदी करत नसून यातील काही व्यापारी सहकारी ऐवजी खाजगी ठिकाणी कांदा खरेदीला प्राधान्य देत असल्याने ज्या शेतकऱ्यांना साठवणुकीची सोय नाही त्यांचा कांदा अवघा चार रुपयांपासून दहा रुपये किलोने खरेदी केला जात आहे.

कांदा बाजार भावातील असमतोल याचा परिणाम कांदा लागवडीवर होत असतो. यंदा खरीप हंगामातील कांद्याला बरा बाजार मिळाला असल्याने अनेक शेतकरी रब्बी, उन्हाळी हंगामात कांदा लागवडीकडे वळाले. तालुक्यातील इतर रब्बी पिकांचे क्षेत्र कमी झाले पण कांदा लागवड वाढली यंदा मजुरी खर्च आवाक्याबाहेर गेल. ,खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्या पण कांद्याचे भाव टिकले तर नक्कीच केलेला खर्च वसुली होईल या आशेवर शेतकऱ्यांणी शेतात कांदा पीक घेतले मात्र आता कांदा काढणी सुरू झाली आणि कांद्याचे बाजार भाव मात्र खाली यायला सुरुवात झाली .

सध्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणि चिंभळा येथे सुरू असलेले कांदा मार्केट ऐवजी व्यापारी सोयीनुसार इतर ठिकाणी कांदा खरेदी करत आहेत. एक नंबर कांदा दहा रुपये किलो, दोन नंबरला सहा ते सात रुपये किलो बाजार तर तीन नंबर कांदा तीन रुपये ते चार रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत आहेत. या भावाने कांदा विकणे परवडत नाही. काही शेतकरी कांदा साठवणूक करत असले तरी अनेक शेतकऱ्यांना कांदा साठवायची अडचण असल्याने आहे त्या भावात कांदा विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. किमान नाफेड चे खरेदी केंद्र सुरू झाले तर बाजार भावाची कोंडी फुटेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

श्रीगोंदयात नाफेडचे कांदा खरेदी केंद्र सुरू व्हायला अडचणी

राज्यात नाफेत मार्फत जी कांदा खरेदी सुरू होते, ती श्रीगोंदा तालुक्यातील एक शेतकरी संस्थेच्या मार्फत सुरू होणार आहे. मात्र अजून पंधरा दिवस तरी हे केंद्र सुरू व्हायला लागतील असे हे केंद्र ज्यांना मंजूर झाले त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या