Tuesday, July 21, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरातील गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्याच्या हालचालींना वेग

Shrirampur : श्रीरामपुरातील गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्याच्या हालचालींना वेग

आकाश दुबैया हत्येनंतर राज्य पातळीवरील वरिष्ठ अधिकार्‍यांची पाहणी || अवैध धंदे, टोळ्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा घेतला सखोल आढावा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा राज्यभर गाजत असताना, महाराष्ट्र पोलीस दलाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे संकेत काल मिळाले. राज्याचे अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी श्रीरामपूरला भेट देत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत तब्बल दोन तास बैठक घेत शहरातील गुन्हेगारीची सद्यस्थिती, संघटित टोळ्यांची हालचाल, अवैध धंदे आणि गुन्हेगारीच्या मूळ कारणांचा सविस्तर आढावा घेतला.

- Advertisement -

यावेळी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर उपस्थित होते. आकाश दुबैय्या यांच्या निर्घृण हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये नागरिकांच्या रोषाला मोठे स्वरूप आले होते. सर्वपक्षीय मोर्चा, सलग चार दिवस शहर बंद आणि गुन्हेगारीविरोधात झालेल्या तीव्र आंदोलनामुळे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर निर्णायक कारवाईचा दबाव निर्माण झाला. आंदोलनादरम्यान काही टोळ्यांची नावेही उघडपणे समोर आली. त्यानंतर संबंधितांकडून खुलासे करण्यात आले, तर पोलीस प्रशासनानेही संशयित आणि सराईत गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम सुरू केली.
गेल्या काही दिवसांत शहर व परिसरात कोम्बिंग ऑपरेशन, झाडाझडती, संशयितांची धरपकड, अवैध धंद्यांवर कारवाई आणि नागरिकांशी थेट संवाद अशा विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

बैठकीत श्रीरामपूरमधील गुन्हेगारीचा इतिहास, संघटित गुन्हेगारीची पार्श्वभूमी, टोळ्यांचे जाळे, नशेच्या इंजेक्शनचा वाढता वापर, अवैध वाळू तस्करी, त्यातून निर्माण होणारे आर्थिक हितसंबंध, नागरिकांमध्ये पसरलेली भीती तसेच कायदा-सुव्यवस्थेसमोरील आव्हानांचा सखोल आढावा घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याच्या सर्वोच्च पोलीस नेतृत्वाने थेट श्रीरामपूरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याने आगामी काळात संघटित गुन्हेगारीविरोधात आणखी कठोर आणि व्यापक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक आक्रमक भूमिका घेईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

राज्याच्या सर्वोच्च पोलीस नेतृत्वाने थेट श्रीरामपूरमध्ये येऊन येथील कायदा व सुव्यवस्थेचा सखोल आढावा घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उच्चस्तरीय पाहणीमुळे पोलीस प्रशासनाकडून आगामी काळात संघटित गुन्हेगारीविरुद्ध व्यापक आणि कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केवळ आढावा बैठका न घेता प्रत्यक्ष कृती आराखडा राबवून संघटित गुन्हेगारीचे आर्थिक आणि गुन्हेगारी जाळे उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे या दौर्‍यानंतर पोलीस प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, सराईत गुन्हेगारांवर कोणत्या स्वरूपाची कारवाई होते आणि शहरात कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या