Wednesday, June 17, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूर बनले गुन्हेगारांचे सुरक्षित आश्रयस्थान

Shrirampur : श्रीरामपूर बनले गुन्हेगारांचे सुरक्षित आश्रयस्थान

सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर गुन्हेगारांच्या ताब्यात गेले आहे का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकेकाळी शांत आणि व्यापारी दृष्टिकोनातून ओळखले जाणारे शहर आता वाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारांचे केंद्र बनले आहे. शहरात अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेले आरोपी मोकाट फिरताना दिसत असून, त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. त्यामुळे श्रीरामपूर हे गुन्हेगारांचे सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे, अशी चर्चा आता चौकाचौकात ऐकू येऊ लागली आहे.

- Advertisement -

शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, मारहाण, खंडणी, अवैध धंदे, धमक्या, टोळीयुद्ध अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये नाव असलेले आरोपी सर्रास फिरताना दिसत आहेत. अनेक गुन्हे दाखल असूनही संबंधित आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत आरोपी पुन्हा शहरात फिरताना दिसतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा धाक गुन्हेगारांवर उरला आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

अलिकडच्या काही महिन्यांत शहरात घडलेल्या घटनांनी परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली आहे. बस फोडाफोड, वाहनांची तोडफोड, चॉपरने वार, धारदार शस्त्रांनी हल्ले, टोळक्यांतील संघर्ष, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत तरुणांच्या टोळक्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणांवरून भांडणे, शिवीगाळ, तलवारी व चॉपरसारखी शस्त्रे घेऊन रस्त्यावर फिरणे, सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारे व्हिडिओ टाकणे अशा घटनांमुळे शहरातील वातावरण अधिकच अस्थिर बनले आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये अनेकदा सराईत गुन्हेगारांचीच नावे समोर येतात. काही आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची चर्चा आहे. तरीदेखील हे आरोपी उघडपणे फिरत असल्याने गुन्हेगारांना राजकीय किंवा स्थानिक पातळीवर अभय मिळत आहे का? अशी शंका सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल जाणवत नसल्याची नाराजी व्यापारी आणि नागरिकांमध्ये आहे. काही सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस परिणाम दिसत नसल्याचा आरोप केला जात आहे.

गुन्हेगारांवर कठोर कारवाई, सराईत आरोपींवर तडीपारसारख्या उपाययोजना, रात्रीची गस्त वाढविणे, संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करणे आणि सोशल मीडियावर दहशत माजविणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नेत्यांवर किंवा प्रभावशाली व्यक्तींवर हल्ल्यांच्या घटना घडल्यावर प्रशासन तत्परतेने हालचाल करते, मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शहरात वाढीस लागली आहे. नेत्यांवर हल्ले होत असतील तर सामान्य माणूस किती सुरक्षित? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने केवळ गुन्हे नोंदविण्यापुरते मर्यादित न राहता गुन्हेगारांवर प्रभावी व दीर्घकालीन नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरात कायद्याचा धाक निर्माण होणे, गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनावरील कमी होत चाललेला विश्वास हे भविष्यात शहरासाठी अधिक गंभीर संकट निर्माण करू शकतात.

व्यापारी वर्ग मानसिक तणावाखाली
शहरातील व्यापारी वर्ग सध्या मोठ्या मानसिक तणावाखाली आहे. बाजारपेठ परिसरात वाढलेली गुन्हेगारी, रात्रीच्या वेळी होणार्‍या संशयास्पद हालचाली आणि टोळक्यांचा वावर यामुळे व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक व्यापार्‍यांनी रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणे कमी केले असून महिलांनाही रात्रीच्या वेळी बाहेर पडताना असुरक्षित वाटत असल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गालाही आता शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता वाटू लागली आहे.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; जून-जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै...