श्रीरामपूर । प्रतिनिधी
तालुक्यातील टाकळीभान येथे सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात ग्रामपंचायत सदस्य असल्याचा आव आणून तीन जणांनी दुकानात घुसून कामगारास धमकावणे, दुकानाचे शटर ओढून आत कोंडणे, तसेच दुकानमालकाला फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना गुरुवारी (११ डिसेंबर २०२५) घडली. या प्रकरणी दुकान मालकाने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की ओम सचिन महाले यांचे श्रीरामपूर, टाकळीभान, लोणी, पुणतांबा व राहता या ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांची दुकाने असून त्यांच्याकडे कामगार कार्यरत आहेत. टाकळीभान येथील ‘पोपट भगीरथ महाले’ या नावाच्या दुकानात संजय शिवाजी सोनार (रा. राजनखोल, ता. राहाता) हे कामगार म्हणून काम पाहतात. गुरुवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता कामगार संजय सोनार यांनी दुकानमालक ओम महाले यांना फोन करून माहिती दिली की, 1) मयुर अशोक पटारे (वय ३०) 2) राजू संजय रनवरे (वय ३०) 3) ‘बंटी’ भालेराव (पूर्ण नाव माहिती नाही) सर्व रा. टाकळीभान हे तिघे एकत्र दुकानात येऊन वाद करण्यास सुरुवात केली. त्यातील मयुर पटारे याने स्वतःला टाकळीभान ग्रामपंचायत सदस्य असल्याचे सांगत, रुपेश भारत भालेराव याची तारण ठेवलेली वस्तू द्या, दुकानाचे कागदपत्र दाखवा, आणि मालकाला बोलवा असा धमकावणीचा सूर लावला.
कामगाराने दुकानाच्या मालकाशी संबंधित कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचे सांगताच तिघांनी रागाच्या भरात ‘तुमचा धंदाच बंद करू’ अशी धमकी देत कामगारास दुकानातच थांबण्यास भाग पाडले. तक्रारीनुसार पुढे तिघांनी जबरदस्तीने दुकानाचे शटर वरून ओढून संजय सोनार यांना दुकानाच्या आत कोंडले. काही वेळानंतर गावातील नागरिकांनी परिस्थिती पाहून शटर उघडवले. यानंतर आरोपी पुन्हा दुकानात पोहोचले व “शटर कोणी उघडले?” असा संताप व्यक्त करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याची माहिती संजय सोनार यांनी त्वरित दुकानमालक ओम महाले यांना फोनवरून दिली. ओम महाले यांनी श्रीरामपूरमधील स्वतःच्या ऑफिसमधून दुकानातील लाईव्ह CCTV फुटेज पाहता संपूर्ण घटना स्पष्ट दिसल्याचे नमूद केले. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत ते ताबडतोब श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गेले.
कामगारास तक्रार देण्यास पोलिसांनी बोलावले; मात्र तो घाबरलेल्या अवस्थेत असल्याने स्वतः तक्रार देण्यास तयार नव्हता. त्यामुळे दुकानमालक ओम महाले यांनी स्वतःच पुढे येत औपचारिक फिर्याद दिली. महाले यांच्या फिर्यादीवरून मयुर अशोक पटारे, राजू रनवरे आणि ‘बंटी’ भालेराव (पूर्ण नाव माहित नाही ) यांच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. 514/2025 असा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या तिघांनी संगनमत करून दुकानातील कामगारास धमकावणे, शिवीगाळ करणे, बळजबरीने शटर बंद करून अडकवणे व दुकानमालकास जिवे मारण्याची धमकी देणे असे कृत्य केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनकुमार बेसाने हे करीत आहेत.





