Saturday, April 4, 2026
HomeनगरShrirampur : नगराध्यक्ष ससाणे यांनी अभूतपूर्व जल्लोषात स्विकारला पदभार

Shrirampur : नगराध्यक्ष ससाणे यांनी अभूतपूर्व जल्लोषात स्विकारला पदभार

मतभेद विसरून विकासकार्यात सर्वांनी सहकार्य करावे- करण ससाणे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचा गड अभेद्य राखुन आई-वडिलांच्या पाठोपाठ सुमारे सात हजार मतांची आघाडी घेऊन जनतेतून नगराध्यक्ष झालेल्या करण ससाणे यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कार्यकर्त्याचा उत्साह, जल्लोष आणि बहुधर्मीय धर्मगुरूंच्या आशीर्वादाने काल प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्याकडून नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. या निमित्ताने नगरपालिका कार्यालयापुढे फटाक्यांची आतिषबाजी, डोलीबाजा लावुन जल्लोष, कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी आणि जेसीबी वरुन माजी आमदार व नगराध्यक्ष स्व.जयंत ससाणे यांच्या कटआऊटला नूतन नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

- Advertisement -

नगर पालिकेच्या सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळ्यासाठी विविध धर्माचे धर्मगुरु सर्वश्री बाबानंद महाराज वीर, ग्यानी सिंग, फादर प्रकाश भालेराव, रमण आणि मुजफ्फर शेख यांनी ससाणे यांना प्रथम आशीर्वचन दिले. याप्रसंगी आमदार हेमंत ओगले, प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, दिपाली ससाणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, अंजुम शेख, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, मुन्ना पठाण, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.वंदना मुरकुटे,ज्ञानेश्वर मुरकुटे, नवनिर्वाचित नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, सोनिया कक्कड, दिपक वमने, प्रणिती दिपक चव्हाण, नागेश्वरी रितेश एडके, कांचन दिलीप सानप, नवनितकौर सेठी, जाकिया शेख, राजेंद्र पवार, शाहेला शहा, शाम अढागळे, यास्मीन शेख, जाहेदाबी कुरेशी, रईस शेख, निलोफर शेख, वैशाली पोटे, आशा परदेशी, योगिता नागले, योगेश जाधव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ.ओगले म्हणाले म्हणाले, मागील निवडणुकीतील पराभवाची परतफेड करण ससाणे याननी डबल मतांनी विजयी होऊन केली. आता यापुढे सर्वांनी एकत्र येऊन शहराच्या विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन करीत त्यांनी सर्वांचे आभार मानले. उत्तर महाराष्ट्रात पूर्ण सत्तेत आलेली श्रीरामपूर ही एकमेव नगर पालिका असल्याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.

सत्काराला उत्तर देताना भाऊक झालेल्या नवनिर्वाचित करण ससाणे यांनी आपल्यावरील जनतेचे प्रेम, सहकार्य आणि आशीर्वादाने मिळालेल्या विजयाबद्दल भाग्यवान समजतो असे सांगत सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यापुढील काळात मतभेद विसरून शहराच्या विकासाचे काम हाती घेऊ. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन पालिकेतील गटनेते मुजफ्फर शेख व संतोष मते यांनी केले. तर आभार नगरसेवक राजेंद्र पवार यांनी मानले.

करण ससाणे गहिवरले
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पदग्रहण सोहळा संपन्न होत असताना उपस्थित सर्वांनी माजी आमदार जयंत ससाणे यांचा जयजयकार केला. त्यावेळी आपल्या वडिलांचे आठवणीने नगराध्यक्ष करण ससाणे यांचे डोळे पाणवले.

एकावर एक फ्री नाही
सभागृहात प्रचंड गर्दी झाली होती. नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका व्यासपीठावर येत असताना महिला नगरसेविकांसोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा वर येत होते. त्यावेळी गटनेते मुजफ्फर शेख यांनी फक्त महिला नगरसेवकांनी वर यावे, आज एकावर एक फ्री नाही अशी कोटी केली.त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

विरोधक अनुपस्थित
या पदग्रहण समारंभात नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार अशोक थोरे यांनी उपस्थित राहून करण ससाणे यांचा सत्कार केला. मात्र दुसरे प्रमुख विरोधी उमेदवार श्रीनिवास बिहाणी तसेच विरोधी भाजपाचे व शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनुपस्थित होते.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By-election : राहुरीत योग्यवेळी उमेदवार जाहीर करणार नी निवडणूकही...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना आता काँग्रेसनेही या लढतीत जोरदार एंट्री केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहीत योग्यवेळी उमेदवार...