Tuesday, June 16, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात सावकारांच्या त्रासाला कंटाळून गवंड्याने घेतला गळफास

Shrirampur : श्रीरामपुरात सावकारांच्या त्रासाला कंटाळून गवंड्याने घेतला गळफास

तीन जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

व्याजाच्या रकमेपोटी वारंवार त्रास देऊन अवाजवी व्याजाची आकारणी करुन शिवीगाळ, दमदाटी व जिवे ठार मारण्याची धमकी देऊन अपमानीत केल्याने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून ‘मला माफ करा, कर्जामुळे लेकरांचे हाल होते’ अशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवत गवंडी काम करणार्‍या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील गायकवाड वस्ती भागात घडली. अर्जून शरणागत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विदया अर्जुन शरणागत (वय-34, धंदा- मजुरीकाम, रा. बेलापूर कमान रोड, गायकवाड वस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या कुंटूबात पती अर्जुन शरणागत, मुलगी मिनल शरणागत व मुलगा अभय शरणागत राहत असून माझे पती हे गवंडी काम करतात. व मी देखील मजुरी काम करुन मिळणार्‍या उत्पन्नातून कुंटुबाचा उदरनिर्वाह चालतो.

माझे पती अर्जुन हे बांधकामाची कामे घेत असल्याने त्यांच्याकडे 6 ते 7 मजुर कामाला असायचे. त्यांना दर आठवडयाला मजुरांचे पगार करण्यासाठी पैशाची गरज पडायची. मात्र वर्षभरापासून पती हे नेहमी तणावात होते. याबाबत मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मजुरांचे पगार देण्यासाठी खाजगी सावकारांचे कर्ज काढले असून पैशासाठी खाजगी सावकार तगादा लावून त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांचे मिळून दीड ते दोन लाख रुपये कर्ज असून त्याच्या व्याजापोटी सावकाकराला दर आठवड्याला 5 हजार रुपये रकमेला 800 रुपये व्याज द्यावे लागत होते. तर जानेवारी 2025 मध्ये शंकर लाड यांनी व्याजापोटी आमची दुचाकी ओढून नेली होती. तीन महिन्यानंतर आम्ही 30 हजार रुपये व्याज दिल्यानंतर त्यांनी गाडी परत केली होती. त्यानंतर पुन्हा जून 2025 मध्ये व्याज थकले म्हणून शंकर लाड याने पुन्हा आमची दुचाकी व्याजापोटी ओढून नेली होती. त्यावेळीही आम्ही लाड यास व्याजापोटी 30 हजार रुपये दिले होते. तसेच दि. 25 मार्च 2026 रोजी माझे पती हे गायकवाड वस्ती येथे बोलत असताना शंकर लाड याने व्याजाच्या पैशावरुन त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली होती व पैसे घेतल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.

तसेच सोमनाथ लाड आमच्या घरी येऊन पैशासाठी तगादा लावत असे. तेव्हा मी स्वतः त्यास 15 हजार रोख रक्कम व्याजापोटी दिले होते. तसेच फेब्रुवारी 2025 ते अद्यापपर्यंत सोमनाथ यास पतीने 1 लाख 16 हजार 100 रुपये व्याजापोटी अद्यापपर्यंत ऑनलाइन पाठविले असूनही ते पैशासाठी तगादा करुन घरी येऊन शिवीगाळ करीत होते. तसेच किशोर गंगावणे ऊर्फ पप्पू हा नेहमीच पैशासाठी आमच्या दारात येऊन शिवीगाळ करीत तगादा करत असे. त्यासही पतींनी वारंवार रोख स्वरुपात काही रक्कम व ऑनलाईन 85 हजार 150 फेब्रुवारी 2025 ते आतापर्यंत पाठविले असूनही आणखी व्याजाचे पैशाची मागणी करुन माझ्या पतीस त्रास देत होता.

या सर्व जाचास कंटाळून माझ्या पतीने दि. 27 मार्च 2026 रोजी राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच त्यांनी मला माफ करा, कर्जामुळे लेकरांचे हाल होत आहे, अशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सोमनाथ लाड, शंकर लाड व किशोर गंगावणे ऊर्फ पप्पू यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 108, 351 (3), 352, 308 (2) तसेच सावकारकी अधिनियम कलम 39, 44, 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Water News : अंबोली धरण कोरडे; त्र्यंबकेश्वरवर पाणीसंकट, गंगापूरमध्ये ११.४...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला (Trimbak Nagar Parishad) पाणीपुरवठा करणाऱ्या अंबोली धरणातील (Amboli Dam) उपयुक्त पाणीसाठा शून्यावर पोहोचल्याने तेथील पाणीस्थिती अत्यंत चिंताजनक...