श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग़्रेसच्या कांचन दिलीप सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर काँग़्रेसच्या तीन तर भारतीय जनता पार्टी जनसेवा विकास आघाडीच्या एका सदस्याची स्विकृत नगरसेवकपदी निवड झाली.
नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 वाजता नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीस प्रारंभ झाला. यावेळी मंचावर मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपस्थित होते. काल सकाळी 11 ते 12 पर्यंत उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी वेळ होती.
मात्र, या पदासाठी केवळ कांचन सानप यांचा एकमेव अर्ज आल्याने नगराध्यक्ष करण ससाणे यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. नगरपालिकेतील काँग्रेस, भारतीय जनता पार्टी जनसेवा विकास आघाडी व शिवसेना या पक्षांच्या सदस्यांचे संख्याबळ पाहता काँग़्रेसच्या सदस्यांची संख्या 20 असल्याने त्यांना तीन स्विकृत सदस्यांची पदे मिळाली. तर भाजपाच्या 11 सदस्य संख्येमुळे त्यांना 1 स्विकृत सदस्य देता आला. शिवसेनेला मात्र एकही सदस्य मिळाला नाही. काँग्रेसच्यावतीने अंजूम शेख, डॉ. दिलीप शिरसाठ व गोपाल लिंगायत या तिघांच्या तर भारतीय जनता पार्टी जनसेवा विकास आघाडीच्या श्रीनिवास बिहाणी यांची स्विकृत सदस्यपदी निवड करण्यात आली.
कांचन सानप, अंजुम शेख, डॉ. दिलीप शिरसाठ व गोपाल लिंगायत यांच्यसह सर्वच नगरसेवकांचा यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीस काँग्रेसचे पक्षप्रतोद मुजफ्फर शेख यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर नगराध्यक्ष व उपगनराध्यक्ष यांच्या दालनात कांचन सानप यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी आमदार हेमंत ओगले, दिपाली ससाणे, सचिन गुजर, लकी सेठी, सनी सानप, चरणजीत कक्कड आदी उपस्थित होते.
सानप व स्विकृत सदस्यांच्या समर्थकांनी पालिकेबाहेर फटाक्यांच्या आतषबाजीत ढोलताशांसह जल्लोष साजरा केला. निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी व नेत्यांनी एकमेकांविरूद्ध आरोप प्रत्यारोप केले होते. व्यक्तीगत पातळीवर जाऊन देखील मोठी चिखलफेक झाली होती. सचिन गुजर यांना झालेल्या मारहाणीमुळे वातावरण आणखीनच तापले होते. मात्र, काल झालेल्या पहिल्या बैठकीत सर्वांनीच हसतमुखाने एकमेकांचे अभिनंदन केल्याने निवडणुकीदरम्यान निर्माण झालेला तणाव निवळल्याचे दिसून आले.




