Tuesday, February 3, 2026
HomeनगरShrirampur : तब्बल 19 वर्षानंतर श्रीरामपूर नगराध्यक्षपद खुले

Shrirampur : तब्बल 19 वर्षानंतर श्रीरामपूर नगराध्यक्षपद खुले

इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे नेत्यांची डोकदुखी वाढली || अनेकजण लागले तयारीला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मिनी आमदारकी म्हणून ओळखले जाणारे श्रीरामपूर नगराध्यक्षपद तब्बल एकोणावीस वर्षांनी खुले झाले आहे, त्यामुळे अनेक मातब्बर नगराध्यक्ष पदाच्या तयारीला लागले आहेत. अनेकांनी मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. काल मुंबई येथे नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्षपद खुले झाल्याचे समजताच श्रीरामपूर शहरात अनेकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

- Advertisement -

सन 2006 मध्ये श्रीरामपूरचे नगराध्यक्षपद हे खुले होते, त्यावेळी संजय फंड यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर मात्र हे आरक्षित होवून आतापर्यंत आरक्षित राहीले. श्रीरामपूर विधानसभा तसेच शिर्डी मतदार संघही आरक्षित असल्याने खुल्या झालेल्या नगराध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांना संधी निर्माण झाली आहे. यामध्ये माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राजश्री ससाणे, किंवा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, अंजुम शेख यांच्याबरोबरच प्रकाश चित्ते, माजी आ. लहू कानडे यांचे बंधु माजी नगरसेवक अशोक कानडे, शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख सचिन बडदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव अ‍ॅड. संतोष कांबळे, माजी नगरसेविका स्नेहल खोरे, राष्ट्रीय श्रीराम सेवा संघाचे सागर बेग आदींसह अनेकांनी नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नगराध्यक्षपद खुले झाल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमणावर वाढली आहे. त्यामुळे उमेदवार ठवविणे नेत्यांना मोठे त्रासदायक ठरणार आहे.

YouTube video player

सन 2016 मध्ये श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत स्व. गोविंदराव आदिक यांच्या कन्या म्हणून जनतेने अनुराधा आदिक यांना संधी दिली. त्यावेळी नगराध्यक्षपदाच्या विजयाची खात्री असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार राजश्री ससाणे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. या निवडणुकीत भाजपचे प्रकाश चित्ते यांच्या पत्नी सौ. दिपाली चित्ते यांनी माघार घेवून अनुराधा आदीक यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सुखर झाला होता. त्यामुळे चित्ते पती-पत्नी पैकी एकजण या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये झालेल्या पक्षांतंर्गत घडामोडीमुळे आगामी नगरपालिका निवडणूक ही बहुरंगी होणार आहे, यात शंकाच नाही. मागील काही दिवसापुर्वी शहरातील काँग्रेसला मोठे खिंडार पडले, पक्षाच्या बारा निष्ठावंत दिग्गजांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपाचे शहरात प्राबल्य वाढले असले तरी दुसरीकडे भाजपा स्थापनेपासूनचे येथील निष्ठावंत कार्यकर्ते मात्र, भाजपापासून दूर गेल्याचे चित्र आहे. तसेच राज्यातील पक्षप्रमुखांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविल्या जातील, अशी घोषणा केली आहे. मात्र त्यास श्रीरामपुरात सुरुंग लागणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून अनुराधा आदिक निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे येथे भाजपाचे सारथ्य करतील. पक्ष म्हणून आदिक आणि विखे हे एकत्र येतील. मात्र, अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश केलेले माजी आ. भानुदास मुरकुटे यांची भुमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे आणि आमदार हेमंत ओगले यांच्याबरोबर मुरकुटे राहतील की युती धर्म म्हणून भाजपा बरोबर जातील? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका एकत्रित लढणार असे जाहीर केले, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले तर श्रीरामपूर शहरातही नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजपा व शिवसेेना एकनाथ शिंदे गट यांनाही एकत्रितपणे लढावे लागणार, वरिष्ठ सुचवतील त्यालाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी लागणार आहे, यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. श्रीरामपुरात विद्यमान आमदार काँग्रेसचा आहे. आणि काँग्रेसकडून इच्छुकांची संख्याही कमी आहे, त्यामुळे येणार्‍या काळात काय-काय घडामोडी घडतात, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्षासाठी यांची नावे चर्चेत
माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, संजय फंड,राजश्री ससाणे, किंवा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, श्रीनिवास बिहाणी, अंजुम शेख, प्रकाश चित्ते, माजी नगरसेवक अशोक कानडे, शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख सचिन बडदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अ‍ॅड. संतोष कांबळे, स्नेहल खोरे, राष्ट्रीय श्रीराम सेवा संघाचे सागर बेग आदींची नावे चर्चेत आहेत.

श्रीरामपूर नगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती-जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी बुधवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी (नवीन प्रशासकीय इमारत) यांच्या कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे. तसेच सदर आरक्षणावर गुरुवार दि. 9 ते मंगळवार दि.14 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....