Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर पालिकेकडून प्लास्टीक बंदीची जनजागृती

श्रीरामपूर पालिकेकडून प्लास्टीक बंदीची जनजागृती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्र शासनाने प्लास्टीक बंदीचा शासन अध्यादेश काढून एक महिना होऊन गेला. त्यावर श्रीरामपूर नगरपरिषदेने जनजागृती मोहीम सुरु केली आहे, मात्र अद्याप कारवाई सत्र सुरू न केल्यामुळे श्रीरामपूर शहरात सर्रास प्लास्टीकचा वापर सुरू आहे. याबाबत लवकरच शहरात कारवाई करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात त्यांनी प्लास्टीक बंदीचे आदेश काढले होते. त्याआदेशान्वये महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्लास्टीक बंदीची मोहीम राबवून अनेक दुकानदार, व्यावसायिकदार यांच्याकडे छापे टाकून प्लास्टीकचा माल जप्त करत कारवाई केली. तसेच अनेक दुकानदारांना दंडही केला. मात्र श्रीरामपूर शहरात अद्याप कोणतीही कारवाई न केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत पालिकेने फ्लेक्स, घंटागाडीवर रेकॉर्डींग, स्पीकरवरून तसेच वृत्तपत्रातून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मात्र लवकरच प्लास्टीक बंदीची मोहीम हाती घेऊन शहर लवकरच प्लास्टीक मुक्त करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.

ठाकरे सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. मात्र मंत्रिमंडळ विस्तार अद्याप नसल्यामुळे खर्‍या अर्थाने नव्या सरकारकडून मागील आदेश रद्द करून काही बदल होतात का? याकडे अधिकारी वर्ग लक्ष देऊन आहेत. तसे नवीन आदेश शासनाकडून जे आदेश प्राप्त होणे गरजेचे आहे ते होत नाही. त्यामुळे बहुतांशी कामे ठप्प आहे.

मार्केटमध्ये सर्व वस्तुंचे पॅकींग हे प्लास्टीकमध्ये केले जातात, किंवा बर्‍याचशा वस्तू प्लास्टीकमध्येच दिल्या जातात किंवा काहीच पर्याय नाही म्हणून काही वस्तू घेण्यासाठी प्लास्टीकचाच वापर केला जातो. प्लास्टीकला अद्याप दुसरा पर्याय नसल्यामुळे प्लास्टीकचा वापर केला जातो. अगोदर ग्राहकांना वस्तू घेण्यासाठी जोपर्यंत दुसरा पर्याय शोधला जात नाही तोपर्यंत आवश्यक वापरासाठी प्लास्टीकचा वापर गरजेचा आहे. त्यासाठी जोपर्यंत प्लास्टीकला योग्य पर्याय मिळत्त नाही तोपर्यंत प्लास्टीक बंदी करू नये.

– रोहीत भंडारी, व्यापारी

- Advertisment -

ताज्या बातम्या