Tuesday, February 3, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूरच्या शिंदे सेनेत ‘म्यान एक तलवारी अनेक’

Shrirampur : श्रीरामपूरच्या शिंदे सेनेत ‘म्यान एक तलवारी अनेक’

वेगवेगळ्या गटाच्या नेत्यांना एकत्र आणणे शिंदे सेनेपुढे मोठे आव्हान

श्रीरामपूर |अशोक गाडेकर| Shrirampur

शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे व शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. त्यामुळे श्रीरामपुरातून शिंदे सेनेत प्रवेश करणार्‍या नेत्यांमध्ये दोन जणांची भर पडली असून आता ही संख्या सहा झाली आहे. त्यामुळे ‘म्यान एक तलवारी अनेक’ अशा परिस्थितीत या नेत्यांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांपुढे उभे ठाकले आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या सत्ताधारी भाजप व शिवसेना (शिंदे गट) पक्षात वेगवगळ्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर नेते व कार्यकर्त्यांची ‘इनकमिंग’ सुरु झाली आहे. त्याला श्रीरामपूरही अपवाद नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी उध्दव सेना सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला व शिर्डी लोकसभेची उमेदवारी पदरात पाडून घेतली. दरम्यानच्या काळात माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे सेनेची वाट धरली. विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला होती.त्यामुळे विधानसभा उमेदवारीचा शब्द घेऊन ते शिंदे सेनेत गेले. मात्र महायुती सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसने या जागेचा हट्ट धरुन ती पदरात पाडून घेतली.

YouTube video player

त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळूनही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द देवूनही भाऊसाहेब कांबळे यांच्या मदतीला येवू शकले नाही. परिणामी कांबळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याच निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी इच्छुक असलेले पढेगाव येथील तरुण उद्योजक जितेंद्र तोरणे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला, मात्र ते उमेदवारी मिळवू शकले नाही. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या सागर बेग यांनीही ना. एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र ती न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार्‍या सागर बेग यांनी तब्बल 50 हजारांचा आकडा गाठत तिसर्‍या क्रमांकाची मते मिळविली. ही मते तत्कालीन विद्यमान आमदार लहू कानडे यांच्यापेक्षा जास्त होती. त्यानंतर मात्र शिंदे सेनेने त्यांना सन्मानाने पक्षात प्रवेश दिला.

श्रीरामपूर मधून शिंदे सेनेत प्रवेश करणार्‍या माजी खा. सदाशिव लोखंडे, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, युवा नेते जितेंद्र तोरणे, सागर बेग या चार नेत्यांपाठोपाठ आता माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी आपले राजकीय वारसदार नातू नीरज सिध्दार्थ मुरकुटे यांच्यासह तर माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी आपल्या समर्थकांसह स्वतंत्र शिंदे सेनेत प्रवेश केल्याने नव्याने प्रवेश करणारांची संख्या सहा झाली आहे. शिंदे सेनेत प्रवेश करणार्‍या प्रत्येक नेत्याचे श्रीरामपुरात स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यात काँग्रेस, जनता दल, शिवसेना, बीआरएस असा प्रवास करुन सध्या कोणत्याही पक्षात नसलेले माजी आ. भानुदास मुरकुटे यांची लोकसेवा विकास आघाडीच्या नावाखाली तालुक्यात मजबूत अशी संघटना आहे. तर माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात जमविलेले कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहे.

माजी खा. सदाशिव लोखंडे यांनीही दहा वर्षाच्या कार्यकाळात श्रीरामपूरला स्थायिक होत राजकारणात जम बसविण्याचा प्रयत्न केला आहे. जितेंद्र तोरणे यांनीही त्यांच्या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून युवकांची फळी उभी करण्यात यशस्वी झाले आहेत. तर सागर बेग यांनी थेट विधानसभा निवडणुकीत उडी घेत त्यांच्या मजबूत अशा युवकांच्या संघटनेच्या जोरावर तसेच हिंदूत्वाचा मुद्दा उठवून 50 हजार मते मिळवत राजकारणात जोरदार ‘एन्ट्री’ केली आहे.
या सर्व नेत्यांनी स्वतंत्रपणे शिंदे सेनेत प्रवेश केल्याने ते आपले स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करणार यात शंका नाही. त्यात गटबाजी चव्हाट्यावर येऊन पक्षबांधणीत अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे या सहा नेत्यांना एकत्र आणण्याचे ‘शिवधनुष्य’ पेलणे सोपे नाही. शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या राज्यपातळीवरील नेत्यांना ह्या नव्याने पक्षात दाखल झालेल्या सहा तळपत्या तलवारी एका म्यान्यात ठेवण्यात कितपत यश येते हे पाहण्यासाठी एखाद्या निवडणुकीची वाट पहावी लागणार इतकेच!.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...