श्रीरामपूर | दीपक उंडे | Shrirampur
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदा शेतकर्यांचा बाजरी व सोयाबीन पेक्षा कपाशी व मका लागवडीकडे अधिक कल दिसून येत आहे. यंदा मकाचे क्षेत्र वाढणार आहे. या हंगामाच्या पूर्वतयारीसाठी कृषी विभागाने तालुक्यातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत बियाणे, खते आणि कीटकनाशके यांच्या उपलब्धतेवर चर्चा करण्यात आली. तसेच शेतकर्यांना पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळावी, यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. यंदा 29 हजार 648 हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सन 2024-25 मध्ये 26 हजार 969 हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मागील खरिपाच्या तुलनेत यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
यंदा राज्यात मान्सूनने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला आहे. यावर्षी खरीप हंगामामध्ये श्रीरामपूर तालुक्यात 29 हजार 648 हेक्टरवर विविध तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य व कापूस या खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कृषि विभागाने पुरेसा खतसाठा, बियाणे आणि कृषी निविष्ठांच्या वितरणाचे बारकाईने निरीक्षण केले आहे. श्रीरामपूर तालुक्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबिन, मका व भुईमूग तसेच बाजरी, मका, सोयाबिन, कांदा, मूग, तूर, उडीद अशी पिके घेतली जातात. मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे कपाशी पिकाची जवळपास 80 टक्के लागवड पूर्ण झाली आहे, आणि इतर पिकांची पेरणी अथवा लागवड करण्यासाठी शेतकरी शेतात वाफसा येण्याची वाट पाहत आहे. या हंगामात 20 जूनपर्यंत खरिपातील सर्व पेरण्या व लागवडी पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे.
श्रीरामपूर तालुक्यात यंदाच्या खरिपात बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, भुईमुग, तूर आदी पिकांसाठी सरासरी क्षेत्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये बाजरी 510 हेक्टर सरासरी उद्दिष्ट असून 120 हेक्टर प्रस्तावित पेरणी क्षेत्र, मका 4100 हेक्टर सरासरी लागवडीचे उद्दिष्ट असून 5760 हेक्टर प्रस्तावित लागवड क्षेत्र ठरविण्यात आले आहे, तसेच सोयाबीनचे 17 हजार हेक्टर सरासरी लागवडीचे क्षेत्र असून 14 हजार 500 हेक्टर क्षेत्र प्रस्ताविक ठेवण्यात आले आहे. कापूस 7600 हेक्टर क्षेत्र सरासरी असून 8 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित ठेवण्यात आले आहे. भुईमुग 110 हेक्टर क्षेत्र तर तूर 910 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित ठेवण्यात आले आहे. वरील प्रमाणे 29 हजार 648 हेक्टर क्षेत्र हे सरासरी खरीपाचे उदिष्ट असून 28 हजार 580 हेक्टर क्षेत्र तालुक्यात प्रस्तावित ठेवण्यात आले आहे.
या खरीप हंगामात शेतकर्यांना आवश्यक रासायनिक खते मिळण्यासाठी तालुका कृषि विभागाने सुमारे 11 हजार 895 मेट्रिक टन खताची मागणी केली आहे, आणि त्यापैकी 9 हजार 156 मेट्रिक टन खते तालुक्यासाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये कृषि विभागाने युरिया 4 हजार 785 मेट्रिक टन, डीएपी 1 हजार 225 मेट्रिक टन, एमओपी 725 मेट्रिक टन, एसएसपी 1 हजार 528 मेट्रिक टन, एन.पी.के. 3 हजार 628 मेट्रिक टन अशी मागणी केली आहे. त्यापैकी तालुक्याला यूरिया 3 हजार 510 मेट्रिक टन, डीएपी 680 मेट्रिक टन, एमओपी 129 मेट्रिक टन, एसएसपी 1242 मेट्रिक टन, एन.पी.के 3595 मेट्रिक टन असा एकूण 9 हजार 156 मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध होणार आहे. तसेच टंचाई काळात युरियाचा बफर साठा म्हणून काही प्रमाणात युरिया उपलब्ध होणार आहे.
त्यानुसार, या हंगामात लागणार्या सर्व पिकांच्या बियाणाचे उच्च प्रतीचे वाण तालुक्यातील बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत. तसेच खते, बियाणे यांचा काळाबाजार व साठेबाजीवर लक्ष ठेवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वात एक भरारी पथक तयार केले आहे, ज्यामध्ये पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी यु.व्ही. राक्षे तर सदस्य म्हणून मंडल कृषी अधिकारी एम.एम. पंडुरे, मंडळ कृषी अधिकारी टाकळीभान डी.आर.गागरे, श्रीरामपूर वजन मापे निरिक्षक एस.ए.चित्ते, गुणनियंत्रण निरिक्षक ए.बी. पावसे आदींचा समावेश आहे. या पथकाने चालू हंगामात तालुक्यातील श्रीरामपूर एम.आय.डी.सी मध्ये अवैधपणे विक्री सुरु असलेल्या खतांच्या साठ्यावर कारवाई करुन त्याठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात खतांचा साठा जप्त केला आहे. तालुक्यात काही गैरप्रकार होत असतील, तर गुणवत्ता नियंत्रण निविष्ठा, उपलब्धता व तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.
तसेच शेतकर्यांसाठी गावोगावी जाऊन बीजप्रक्रिया मोहिम राबवली जाणार आहे. हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, खरीप हंगामातील पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षण, तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड (पेरू, आंबा, चिक्कू, डाळिंब व शेवगा) यासाठी तांत्रिक मान्यता, शेती शाळा नियोजन, घरगुती चाचणी पद्धतीने बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक, होर्टसॅप शेतकरी निवड आदींबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यु.व्ही. राक्षे यांनी दिली.





